धनंजय मुंडे
--
‘छत्रपती संभाजीनगरात घ्या
मंत्रिमंडळाची विषेष बैठक’
--
दुष्काळी स्थितीवर उपाययोजनांची गरज
--
परळी वैजनाथ, ता. ८ (बातमीदार) : जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या १७ सप्टेंबर रोजी किंवा तत्सम कालावधीत लवकरात लवकर मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने तीव्र ताण दिल्याने मराठवाड्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. यामुळे पेरलेली सर्व खरीप पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरी आणि तलावांतील जलस्रोत कोरडे पडल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करणार आहे.
येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडणार आहे. याच औचित्याने तेथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन मराठवाड्यासाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्यात यावे. या बैठकीत कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती देणे, खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई, रब्बी हंगामाचे नियोजन, तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाअभावी बिकट परिस्थिती असल्याने तेथेही स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णय घ्यावेत, असे धनंजय मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.