शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी
शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा
दुष्काळी पाहणी दौऱ्याचे संकेत, प्रतापसिंह पाटील यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ९ : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती भीषण होऊ लागली आहे. पावसाच्या दडीमुळे पिकांचे अभूतपूर्व नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी भरपाई मिळावी, यासह महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी व स्थानिक सामाजिक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मदतीसाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.
बैठकीत तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी, विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर करून योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार लवकरच जिल्ह्याचा दौरा करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली. येत्या काही दिवसांत ते जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. या दौऱ्यादरम्यान ते थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करतील. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राज्यस्तरावर अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यास मदत होणार आहे. बैठकीस गटनेते खलिफा कुरेशी, नगरसेवक बबलू शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, एजाज काजी, विशाल शिंगाडे, नरसिंह मेटकरी, अशोक देवकते, पंकज भोसले, सर्फराज कुरेशी आणि अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष सूरज वडवले उपस्थित होते.
......
धाराशिव ः जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती आणि पीक नुकसानीची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देताना राष्ट्रवादीचे (एसपी) जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील. यावेळी उपस्थित शिष्टमंडळातील प्रतिनिधी.
.....
फोटो क्रमांक ः OSM26B06942