ABD26J79817
पंचायत समितीसमोर मोरया ग्रुपने साकारेलेला भूत बंगल्याचा देखावा.
-
ABD26J79818
महात्मा फुले पुतळा परिसरातील दंडनायक ग्रुपने हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर महादेव मंदिराची साकारलेली प्रतिकृती.
मनमोहक देखाव्यांने वैजापूर नटले
-
शहरातील ६० हून अधिक गणेश मंडळांत भाविकांची गर्दी
वैजापूर, ता. २० (बातमीदार) : भव्य व देखण्या गणेशमूर्ती, कल्पक सजावट, विविध संकल्पनांवर आधारित देखावे आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई यामुळे गणेश चतुर्थीपासूनच वैजापूरनगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे.
शहरात सुमारे ६० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना केली असून, हे मनमोहक देखावे पाहण्यासाठी अबालवृद्धांसह भाविकांची रस्त्यांवर मोठी गर्दी होत आहे.
संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात महायोध्या गणेश मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात भव्य देखावा उभारला आहे, तर याच भागातील देवा ग्रुपने साकारलेला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. दंडनायक ग्रुपने हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध केदारेश्वर महादेव मंदिराची उभारलेली हुबेहूब प्रतिकृती विशेष कौतुकास पात्र ठरत आहे. पंचायत समितीसमोरील मोरया ग्रुपने यंदा ‘भूत बंगला’ ही अनोखी संकल्पना मांडली आहे. या दरबारात प्रवेश करताना विविध प्रकारचे भीतीदायक मुखवटे व ध्वनिक्षेपकावरील थरारक आवाजामुळे नागरिकांना आगळावेगळा थरार अनुभवायला मिळत असून, हा देखावा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. याशिवाय फुलेवाडी रस्त्यावरील युवा प्रतिष्ठानने उभारलेला आकर्षक देखावा रात्रीच्या लखलखत्या रोषणाईत अधिकच खुलून दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शहरात गणेशोत्सवाचा चैतन्यमय उत्साह पाहायला मिळत आहे.