वैजापूर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट
-----
नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण; पोलिसांच्या रात्रगस्तीवर संताप
----
वैजापूर, ता. २६ (बातमीदार) : काही दिवसांपासून वैजापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी (ता. २२) मध्यरात्रीपासून शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंत चोरट्यांनी शहरात अक्षरशः धुमाकूळ घालत व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षेला उघड आव्हान दिले. मुरारी पार्क परिसरातील चार दुकाने फोडण्यासोबतच पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. एवढ्यावरच न थांबता गोदावरी कॉलनी व आदर्श कॉलनी परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचाही प्रकार घडला.
नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आणि घरांबाहेरही खासगी कॅमेरे कार्यरत आहेत. मात्र, घटना घडल्यानंतर चोरट्यांचा माग काढण्यात आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यात हे फुटेज कितपत प्रभावी ठरत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ कॅमेरे असणे पुरेसे नसून, रात्रीचे चित्रण, फुटेजची गुणवत्ता आणि वेळेत तपास यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
------
बिट अंमलदारांचे दुर्लक्ष;
गस्त केवळ सायरनपुरती?
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बिटनिहाय अंमलदारांची नेमणूक केलेली असते. सराईत गुन्हेगार, बंद घरे, बाजारपेठ आणि संशयितांवर नजर ठेवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, बिट अंमलदारांचे लक्ष चोरीच्या प्रतिबंधापेक्षा अन्य विषयांवरच अधिक असल्याचे चित्र आहे. तसेच पोलिसांची रात्रगस्त केवळ मुख्य रस्त्यांवरून सायरन वाजवत फेऱ्या मारण्यापुरती मर्यादित न राहता, ती चोरीप्रवण वसाहती, बंद दुकाने, एटीएम परिसर आणि शहराच्या निर्गमन मार्गांवर नियोजनबद्ध पद्धतीने होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांना सुरक्षेची केवळ कागदी हमी नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव हवा आहे.
--
((कोट))
दीड महिन्यापूर्वी खंडाळा येथे घडलेल्या जबरी चोरीचा तपास सुरू आहे. ग्रामीण भागात विद्युतपंप किंवा केबलचोरीच्या काही तक्रारी दाखल आहेत. शहरात मात्र दोन दिवसांपूर्वीची चोरी आणि शनि मंदिर परिसरात महिलेची चेन हिसकावल्याच्या घटनेव्यतिरिक्त अन्य गुन्हा दाखल नाही. यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या संशयित चोरट्यांची ओळख पटली असून, त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल. रात्रगस्तीवरील पथकाला विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही परिसरात फिरणाऱ्या संशयित व्यक्ती किंवा हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी.
- विनय सोनवणे, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक, वैजापूर