वामननगरात घरफोडी; सव्वा
लाखांचा ऐवज लंपास
नांदेड : शहरातील वामननगर परिसरात बंद घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१५ या कालावधीत घडली. याप्रकरणी अमोल अनंतराव हाळे (वय ३७, रा. वामननगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जहागिरदार करीत आहेत.
-----
धर्माबादमध्ये २९ हजारांचा गुटखा जप्त
नांदेड : धर्माबाद शहरातील फुलेनगर परिसरात अवैध विक्रीसाठी साठवून ठेवलेला २९ हजार २३४ रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. शेख अफसर शेख दाऊद पटेल (वय २८) आणि शेख अन्सार शेख दाऊद पटेल (दोघे रा. फुलेनगर, धर्माबाद) हे १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास विनापरवाना विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विठ्ठल सुपारे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अन्नसुरक्षा व मानके अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक ठेंगे करीत आहेत.
----
जुगारावर छापा; नऊ जणांवर गुन्हा नोंद
नांदेड : शहरातील जवाहरनगर परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नऊ जणांना पकडण्यात आले असून, दोन मोबाइल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. साईनाथ बालाजी कोल्हे (वय २८, रा. भायगाव) याच्यासह अन्य आठ जण विनापरवाना तिर्रट नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळले. पोलिस कर्मचारी शंकर माळगे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार पचलिंग करीत आहेत.
----
माळकौठ्यात गावठी दारूचा साठा जप्त
नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेली १३ हजार २०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता माणिका गोनेवाड (वय ४०, रा. माळकौठा, ता. मुदखेड) हा १५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावठी हातभट्टीची दारू चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळले. पोलिस हवालदार दिलीप चक्रधर यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुनकुंवर करीत आहेत.