जंगले तहानली; पाणवठे कोरडे!

जंगले तहानली; पाणवठे कोरडे!
Published on: 
मेन ---- OSM26B07133 वाशी ः वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी असलेला राखीव वनातील पाणवठा सध्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. ------- जंगले तहानली; पाणवठे कोरडे ------ वाशी, खेडसह वन परिसरातील पाणवठ्यांत टँकरने पाणी भरण्याची गरज ---- धाराशिव, ता. ५ (बातमीदार) : यंदा सर्वत्र पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. एका बाजूला प्रशासनाला पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांची तहान भागविण्यासाठी विहिरी, कूपनलिकांच्या अधिग्रहणासारखे मार्ग स्वीकारावे लागत आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यात आधीच जेमतेम असलेल्या वनक्षेत्रातील वन्यजीवांची तहान भागविण्याची गरज निर्माण झाली आहे. आता वनातील नैसर्गिक स्रोतांसह वन विभागाने तयार केलेले काही ठिकाणचे कृत्रिम पाणवठेही कोरडे पडत चालले आहेत. जिल्ह्यात धाराशिव, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा तालुका परिसरातील डोंगररांगांमध्ये व वनक्षेत्रात हरीण, लांडगे, कोल्हे, मोर, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांचा वावर आहे. मात्र, पावसाअभावी झाडाझुडपांची पाने वाळली असून, वनातील पाण्याचे बहुतांश झरे कोरडे पडले आहेत. वन विभागाने पूर्वी तयार केलेल्या सिमेंटच्या व मातीच्या कृत्रिम पाणवठ्यांमधील पाण्याने आता तळ गाठला आहे. काही ठिकाणी वन्यजीवांना पिण्यायोग्य पाणी नसल्यामुळे तहान भागविण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. जिल्‍ह्यात वाशी, अपसिंगा, खेड, धाराशिवमधील हातलाईच्या वनपरिसरात वन्यजीवांचा वावर आहे. वाशी, खेड येथे टंचाईच्या काळात वन्यजीवांना तहान भागविता यावी, यासाठी वन विभागाने पाणवठे तयार केले आहेत. वनातील नैसर्गिक झरे आटल्यानंतर पाण्याचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, वन्यजीवांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून उन्हाळ्याच्या किंवा टंचाईच्या कालावधीत या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकले जाते. मात्र, यंदा अपेक्षित पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे वनातील पाणवठ्यांमध्ये आता टँकरने पाणी भरण्याची गरज निर्माण झाली आहे. ---- नागरिकांसह मुक्या जीवांची तहान भागविणे गरजेचे खेड परिसरातील वनामध्ये तेथे असलेल्या कूपनलिकांतील पाण्याचा सध्या वन्यजीवांना आधार आहे. तेथे कूपनलिकेचे पाणी नैसर्गिक ठिकाणी सोडले जाते. त्यातून वन्यजीवांची तहान भागते. मात्र, वाशीच्या राखीव वनातील काही पाणवठे कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे तेथील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासह शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून शेतांच्या सीमेवर वन्यजीवांसाठी पाण्याच्या कुंडीची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे १११ गावांची तहान भागविण्यासाठी अधिग्रहण करून पाण्याचे नियोजन केले जात असताना, निष्पाप वन्यजीवांची तहान भागविण्यासाठीही आता नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरडे पडत झालेले नैसर्गिक झरे लक्षात घेता आता सर्व पाणवठे पाण्याने भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ------ परिसरातील शेतशिवारांत वन्यजीवांची भटकंती दुष्काळी व पाणीटंचाईच्या परिस्थितीत राखीव वनामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यास सुरवात झाल्यानंतर वन्यजीव तहान भागविण्यासाठी परिसरातील शेतशिवारात असलेल्या विहिरीवर जातात. शेतामध्ये शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिल्यानंतर तेथे साचलेल्या पाण्यावरही हे वन्यजीव तहान भागवितात. मात्र, यंदा पावसाअभावी शेतशिवारातही तशी स्थिती नाही. ---------- ((कोट)) वाशी येथील राखीव वनातील पाणवठ्यांमध्ये वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी नियमित टँकरने पाणी भरले जाते. सध्या काही ठिकाणचे नैसर्गिक झरे कोरडे पडले आहेत. काही पाणवठ्यांची स्वच्छता करून तेथेही टँकरने पाणी भरण्यात येणार आहे. - वैजीनाथ कुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com