आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली
---
दुष्काळाची झळ; पालक, मेथी, चुका, कोथिंबीर ३० रुपयांना जुडी
----
धाराशिव, ता. ५ (बातमीदार) ः जिल्ह्यातील पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे परिणाम जाणवण्यास सुरवात झाली आहे. पावसाअभआवी विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट होत असल्याने उपलब्ध कमी पाण्यावर भाजीपाला पिकवणे कठीण झाल्याने स्थानिक आठवडे बाजारात पालक, मेथी, चुका, कोथिंबिरीसारख्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. दुसरीकडे बाजारात आवक वाढल्याने पत्ताकोबीचे दर मात्र घसरले आहेत.
जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस नसल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकविणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन यंदा उत्पादन घेणे टाळले आहे. त्यामुळे बाजारात आवक सातत्याने घटत आहे. रविवारी शहरात भरलेल्या आठवडे बाजारात पालक, मेथी, चुका आणि कोथिंबीर या पालेभाज्यांची प्रतिजुडी ३० रुपयांवर पोचली होती. याउलट, पत्ताकोबीची आवक वाढल्याने तिची विक्री १० रुपयांना एक गड्डा किंवा ४० ते ६० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे करावी लागत आहे. टोमॅटो व बटाट्याचे दर स्थिर असून, त्या दर ३० रुपये प्रतिकिलो होता. बीटच्या दरातही घसरण झाली असून, ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. गवारीचे दर मात्र प्रतिकिलो १०० पार असेच आहेत. भेंडीचा भावही प्रतिकिलो २० रुपयांनी कमी होऊन सध्या प्रतिकिलो ६० रुपये असे आहेत. कांद्याचे भाव मात्र महिनाभरापासून प्रतिकिलो ६० ते ७० असा कायम आहे.
----
आणखी घटणार आवक
पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे आगामी काळात भाजीपाल्याची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. शहर व परिसरातील बहुतांश शेतकरी उपलब्ध पाण्यावर नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. त्याच्या विक्रीतून घरप्रपंचाला हातभार लागत असल्याने अनेक शेतकरी अर्धा ते दोन एकरांमध्ये विविध भाजीपाल्यांचे पीक घेतात. यंदा मात्र पावसाने फटका दिल्याने भूगर्भातील पाणीपातळी घटली. अशा परिस्थितीत लागवड करूनही भाजीपाल्याचे उत्पादन हाती लागण्याची शक्यता कमी असल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे.