आंतरशालेय, औद्योगिक व्हेरॉक क्रिकेट स्पर्धा ६ डिसेंबरपासून
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : क्रिकेटप्रेमी खेळाडूंसाठी पर्वणी ठरणाऱ्या १८ व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट ट्रॉफी आणि २० व्या व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट ट्रॉफी स्पर्धांना ६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (एडीसीए) सिडको एन-२ मैदानावर या दोन्ही स्पर्धांचे सामने रंगणार आहेत.
२० व्या व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून, त्यामध्ये १० औद्योगिक आणि १० बिगर औद्योगिक संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील सामने दररोज खेळविण्यात येणार आहेत. दरम्यान, रविवारी ( ता. १५) एन-२ येथील एडीसीए मैदानावर स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. यावेळी स्पर्धा सचिव राहुल टेकाळे, स्पर्धा सदस्य अनंत नेरळकर, दिनेश कुंटे, वरिष्ठ पंच सय्यद जमशीद, अक्षय गोयल, मच्छिंद्र जाधव, वरिष्ठ प्रशिक्षक कर्मवीर लहेरा, असीर सिद्दीकी, संघटनेचे सहसचिव करण डोग्रा यांच्यासह विविध संघांचे कर्णधार, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि पंच उपस्थित होते. दरम्यान, आंतरशालेय स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गायकवाड ग्लोबल हायस्कूल विरुद्ध नाथ व्हॅली हायस्कूल, तर औद्योगिक स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना श्रुती इंडस्ट्रीज विरुद्ध जॉन्सन अँड जॉन्सन यांच्यात होणार आहे. औद्योगिक स्पर्धेत दररोज दोन सामने होणार आहेत. या स्पर्धेतील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्हेरॉक ग्रुपचे हेड (एम्प्लॉई रिलेशन्स अँड सीएसआर) सतीश मांडे यांनी केले आहे.
--------
औद्योगिक आणि बिगर औद्योगिक संघ मैदानात
औद्योगिक गटात एआयटीजी, एनआरबी, स्कोडा ऑटो, कॉसमो फिल्म्स, बजाज ऑटो, श्रुती इंडस्ट्रीज, गुडइयर, जॉन्सन अँड जॉन्सन, मासिया आणि मॅटियास एमआर इलेव्हन या संघांचा समावेश आहे. बिगर औद्योगिक गटात सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), जिल्हा वकील संघ (डीबीए), डॉक्टर्स युनायटेड, ॲडव्होकेट्स हायकोर्ट, शहर पोलिस, आयआयए, ग्रामीण पोलिस, बँकर्स, महावितरण (एमएसईडीसीएल) आणि महसूल विभाग-महसूल प्रबोधिनी हे संघ सहभागी होणार आहेत.
----------
आंतरशालेय स्पर्धेत २० शाळा
१८ व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत वुडरिज हायस्कूल, नाथ व्हॅली हायस्कूल, केंब्रिज इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, अँगल किड्स हायस्कूल, राजा शिवाजी विद्यालय (बजाजनगर), एसएफएस हायस्कूल, ऑर्किड टेक्नो स्कूल, गायकवाड ग्लोबल हायस्कूल, आर. जे. इंटरनॅशनल स्कूल, पीएसबीए स्कूल, देवगिरी ग्लोबल अकॅडमी, नॅशनल इंग्लिश स्कूल, चाटे स्कूल, किड्स प्राइड हायस्कूल, एसबी हायस्कूल, किड्स किंगडम हायस्कूल, सीएसएमसी स्कूल (महानगरपालिका), सीएसआर इंटरनॅशनल स्कूल आणि उज्वलाताई पवार हायस्कूल या २० शाळांचे संघ सहभागी होणार आहेत.
....