सिंदखेडच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप
-----
सोमवार, गुरुवार सुरू राहील नुसतेच फलक
----
सारखणी, ता.१९ (ता.१९) : माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील पशुवैद्यकीय दवाखाना कुलूपबंद अवस्थेत आढळल्याने पशुपालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दवाखान्याच्या भिंतीवरील सूचनाफलकावर सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी दवाखाना सुरू राहील, असे नमूद केले आहे. मात्र, नियोजित दिवशीही दवाखाना बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सोमवारी दवाखान्यात गेल्यानंतर इमारतीला कुलूप असल्याचे आढळून आले. आठवड्यातून केवळ दोन दिवस सुरू राहणारा दवाखाना त्याच दिवशी बंद असल्यास आजारी जनावरांवर उपचार कुठे करून घ्यायचे, असा प्रश्न पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उपजीविकेत पशुपालनाचा महत्त्वाचा वाटा आहे. जनावरे आजारी पडल्यास वेळेवर उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र, दवाखाना बंद असल्याने पशुपालकांना आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. या प्रकाराची संबंधित पशुवैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि दवाखाना निर्धारित वेळेत नियमित सुरू राहील, याची खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.