विजयादशमीदिनी ‘विवेकयात्रे’तून बळिराजाला मदतीचा हात
----
उमरगा, ता. १८ (बातमीदार) : सहा वर्षांपासून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शहरात आयोजित केली जाणारी ‘विवेकयात्रा’ यंदा एका वेगळ्या सामाजिक जाणिवेतून पार पडणार आहे. उमरगा व लोहारा तालुक्यांतील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची विवेकयात्रा केवळ विचारप्रचारापुरती मर्यादित न ठेवता दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजूर बांधवांना मदतीचा आधार देण्यासाठी काढण्यात येणार आहे.
ही विवेकयात्रा मंगळवारी (ता. २०) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शहरातील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाविद्यालय या मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. समाजात वाचन संस्कृती, विवेकवादी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि माणुसकीचा संदेश पोचविण्याच्या उद्देशाने हातात पुस्तके, लेखण्या आणि महामानवांचे विचारफलक घेऊन ही यात्रा काढली जाते. मात्र, सध्या दुष्काळामुळे बळिराजा व शेतमजूर मोठ्या संकटात असल्याने विचारांना कृतीची जोड देणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी नमूद केले. या विवेकयात्रेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी आर्थिक व वस्तुरूप मदतीचे संकलन केले जाणार आहे. या उपक्रमात सर्व नागरिक, मित्रपरिवार, सहकारी, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व संस्था-संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या परीने शक्य ती मदत करावी, असे आवाहन प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय (मुळज) आणि ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या (उमरगा) वतीने ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी केले आहे.