विस्तार अधिकारी बनले प्रशासक

विस्तार अधिकारी बनले प्रशासक
Published on
२७ ग्रामपंचायतींचा कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती; केवळ तीन अधिकाऱ्यांकडे कारभार ----- जळकोट, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतींचा कारभार आता विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, या २७ ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार केवळ तीन विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांसाठी किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. यापैकी जे आधी घडेल, तोपर्यंत प्रशासकांचा कार्यकाळ राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २७ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी-मार्चमध्ये संपली होती. निवडणुका झालेल्या नसल्याने या ग्रामपंचायतींवर सुरवातीला सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ही नियुक्ती होऊन सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टअखेरीस सरपंचांचा प्रशासक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर या ग्रामपंचायतींचा कारभार कोणाकडे सोपविला जाणार, याकडे लक्ष लागले होते. शासनाच्या नव्या आदेशानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी (पंचायत) किंवा अन्य शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, त्यांना निधी खर्चाचे अधिकार नसल्याने गावातील विकासकामांवर परिणाम झाला होता. परिणामी प्रशासकीय काळात ग्रामपंचायतींचा कारभार अडखळत सुरू होता. प्रशासक असलेल्या सरपंचांना निधी खर्चाचे अधिकार मिळावेत, यासाठी काही सरपंचांनी न्यायालयातही धाव घेतली होती; मात्र त्यांना यश आले नव्हते. आता २७ ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार तीन विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याने गावातील विकासकामांना आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला कितपत गती मिळते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ----- राज्य शासनाचे आदेश आल्यानंतर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. त्यांना निधी खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे विकासकामे मार्गी लागतील. -ऐश्वर्या चितारी, गटविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com