सात ग्रामपंचायतींच्या विकासकामांची चौकशी करा
---
खासदार आष्टीकर ः मंजूर निधीच्या विनियोगाची तपासणी होणार
----
सारखणी, ता.१ (बातमीदार) : ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि विकासकामांसाठी मंजूर निधीचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माहूर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमधील विविध विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. याप्रकरणी त्यांचे सहकारी गौरव राठोड प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहेत.
गोंडवडसा, अंजनखेड, सेलू करंजी, शेकापूर, सिंदखेड, पारडी आणि हारडफ या ग्रामपंचायतींचा चौकशीसाठी समावेश करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत पंधरावा वित्त आयोग, जल जीवन मिशन, मनरेगा आणि जिल्हा नियोजन व विकास समितीच्या जनसुविधा योजनांतर्गत मंजूर निधीच्या विनियोगाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी ई-ग्रामस्वराज पोर्टलवरील आर्थिक नोंदी, कामांचे जिओ-टॅगिंग, मोजमाप पुस्तिका (एमबी रेकॉर्ड) आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती यांची पडताळणी करण्यावर भर देण्यात आला आहे. अनेक गावांत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि पथदिव्यांबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. मंजूर निधीतून प्रत्यक्ष किती कामे पूर्ण झाली, याची स्थळपाहणी करून वस्तुनिष्ठ चौकशी करावी. अनियमितता किंवा निधीचा अपव्यय आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खासदार आष्टीकर यांनी केली आहे.