‘विष्णुपुरी’तून सिंचनाचे आवर्तन नाही
-----
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ः पिण्याच्या पाण्याला प्राधान्य; उपलब्ध साठ्यात ६.२९ दलघमीची तूट
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १९ : विष्णुपुरी प्रकल्पातील मर्यादित उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य होणार नाही. नांदेड शहरासह ग्रामीण भाग आणि औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध पाणीसाठा राखून ठेवणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामासाठी किमान एक आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नुकतेच प्रकल्पातील पाणीसाठा, भविष्यातील पाण्याची गरज आणि उपसा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आय. एम. चिश्ती, कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड आणि उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण उपस्थित होते.
सध्या विष्णुपुरी धरणात ५७.१४ टक्के म्हणजेच ४६.१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. अंतेश्वर बंधाऱ्यातील ७.८८ दलघमी साठा धरून एकूण उपलब्ध पाणी ५४.०४ दलघमी आहे. मात्र, ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत अपेक्षित असलेले १८ दलघमी बाष्पीभवन वजा केल्यानंतर प्रत्यक्ष उपलब्ध पाणी ३६.०४ दलघमी राहणार आहे. दुसरीकडे, याच कालावधीत नांदेड शहरासाठी ३८.९० दलघमी, औद्योगिक वापरासाठी १.७३ दलघमी आणि ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी १.७० दलघमी, असे एकूण ४२.३३ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. परिणामी, उपलब्ध पाणीसाठा आणि अपेक्षित गरज यामध्ये ६.२९ दलघमीची तूट निर्माण होत आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी पाण्याची मर्यादा लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
----
१४ पंप नादुरुस्त; जलवाहिन्यांनाही गळती
पाणीसाठ्याबरोबरच प्रकल्पातील उपसा यंत्रणेची स्थितीही चिंताजनक आहे. प्रकल्पातील १४ पंप नादुरुस्त असून, केवळ चार पंप कार्यरत आहेत. या पंपांची कार्यक्षमताही ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. रायझिंग मेनच्या तिन्ही जलवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती आणि फुटी असल्याने सिंचनासाठी पाणी सोडल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होण्याची शक्यता आहे. परिणामी, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचविणेही कठीण होणार आहे.
----------
मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
प्रकल्पावर नवीन पाइपलाइन आणि पंप बसविण्याचे काम सुरू असून, ते मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र, तोपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंचनासाठी आवर्तन देण्याऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.