
Sant Bhagwan Baba : कृतीशील समाजसुधारक श्री संत भगवानबाबा
"तैसा व्यासाचा मागोवा घेतु" या संत ज्ञानेशांच्या प्रेमानुभूतीनुसार जेष्ठ-श्रेष्ठांचा मागोवा घेऊनच जीवनाची खडतर वाट सुकर करण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित आहे. आधुनिक काळात अनेक सामान्यांतील सामान्य माणसांनीच असामान्य इतिहास घडवला आहे ! आजमितीला कुणीही कुणाला तुच्छ लेखू नये अथवा आत्मक्लेश करून घेऊ नये. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये,
दिवटीच्या आंगीं थोरी | तरी ते बहु तेज धरी |
वाती आपुलिया परी | आणीच कीं ना ? ॥
ह्या ओव्यांच्या द्वारे दिवटी असो की वात, आपापल्या परीने प्रकाश देण्याचे कार्य करत असते असा उपदेश करतात.
याच न्यायाने महाराष्ट्राच्या दुर्गम, मागास आणि उसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सामान्य कुटुंबात कृतीशील समाजसुधारक राष्ट्रसंत भगवानबाबांचा जन्म झाला. बीड जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावरील विविध नद्यांच्या उगम-संगमावरील सुप्पे सावरगावात श्रावण वद्य पंचमी, शके 1818 (29 जुलै, 1996) सोमवार रोजी सूर्योदय समयाला सौ.कौतीकाबाई तुबाजी सानप (पाटील) यांच्या पोटी आबाजी नावाचे रत्न जन्मले.
आबाजींचे बालपण कडक शिस्त आणि संस्कारात गेले. एकीकडे आईचे रामायण-महाभारताचे भक्तिभावाने श्रवण, गावातील नित्य भजन-कीर्तन याचे संस्कार बाल आबाजींवर झाले, तर दुसरीकडे वडील तुबाजी पाटील हे गावची पाटीलकी सांभाळतांना आपल्या मुलाबाळांवर शिस्त, व्यायाम, जिद्द आणि कष्ट करण्याचे संस्कार रुजवले.
'येथं वडील जे जे करिती तया नाम धर्म म्हणीती' या न्यायाने आपल्या घरातच आबाजींना आई-वडील आणि अन्य मंडळींकडून सुसंस्कार आणि शिस्तीचे बाळकडू मिळाले. घरातील सर्व नियमित संस्कार-सोपस्कार चालले असतांना विद्यार्थी दशेतील बाल आबाजी मात्र थोडा एकटा आणि आपल्याच विचारात मग्न असायचा.
कधी-कधी एकटाच शून्यात दृष्टी ठेवून तासंतास एकाच जागी बसायचा ! अक्षरशः आई कौतीकाबाई त्याला हलवून भानावर आणायच्या ! घरातील सर्वांनाच आबाजीचं हे वर्तन थोडं विचित्रच वाटायचं ! तर दुसरीकडे अभ्यासु वृत्ती, आज्ञाधारकता, वळणदार अक्षर, रुबाबदार बोलणे, शांत-संयमी स्वभाव यामुळे शाळेत आबाजी शिक्षकांचा आणि गावात सवंगड्यांचा जिवलग झाला.
आबाजी मात्र आपल्या मित्रांसोबत सामान्य खेळ न खेळता मुलांना आपल्या भोवताल बसवून भजन म्हणायचा, पोथी वाचायचा ! एका दिवशी तर बाल आबाजीने पोरा-बाळांना गोळा करून अक्षरशः कीर्तनच केले ! असां हा बालपणीचा काळ भुर्रकन उडून गेला आणि गावातील दुसरीपर्यंतची शाळा संपल्यावर आबाजींना पुढील शिक्षणासाठी मामाच्या गावी लोणीला जावे लागले.
बालवयातील संस्कारांनी समृद्ध झालेले आबाजी हे अगदी कमी वयात समाजसुधारणेचा विचार करू लागले. मामाच्या गावी शिक्षण घेऊन दोन वर्षांनी आबाजी पुन्हा आपल्या गावी परतले. सावरगाव घाट परिसरातील डोंगरमाथ्यावर गाई सांभाळण्याचे सोपे काम आबाजीने स्वीकारले.
सावरगावात गीतेबाबा दिघुळकर यांच्या दिंडी मुक्कामास गीतेबाबांचे सुंदर कीर्तन झाले आणि सकाळी आबाजी घरी कुणालाही न सांगता गीतेबाबांच्या दिंडीत पंढरपूरला निघून गेले. त्यानंतर एकावर एक महत्वपूर्ण घटना घडल्या.
आबाजी पंढरपूर वारीवरून परतल्यानंतर मंदिरावरच थांबले. 'घरी सर्वजण जर माळकरी होत असतील तरच मी घरी येईन अशी आट घातली आणि मुलाच्या हट्टापायी पाटलांनी तुळसी माळ घालून मांसाहार वर्ज्य करण्याचे अभिवचन दिले. समाज सुधारणेची मुहूर्तमेढ घरीच रोवली आणि भक्ती-ज्ञान क्षेत्रांत एक क्रांतिकारी पाऊल टाकले !
आता मात्र आबाजींचे घरातील कोणत्याच कामात मन लागेनासे झाले, परिणामी त्यांनी नारायण गडावर माणिक बाबांच्या मार्गदर्शनात अभ्यास करायचे ठरवले. तिथे माणिक बाबांच्या सानिध्यात वारकरी, अध्यात्म आणि ज्ञानाचे संस्कार करून माणिक बाबांनी त्यांना आबाजी नाव बदलून भगवान हे नाव प्रदान केले.
तेंव्हापासून आबाजी भगवान बाबा म्हणून ओळखले जाऊ लागेल. त्यानंतर गावोगावी लोक बाबांना कीर्तनांसाठी बोलावू लागले. बलदंड देहयष्टी, नैष्टिक ब्रह्मचर्य, खडा आवाज, सुमधुर गायन आणि सखोल ज्ञान भगवान बाबांच्या कीर्तनातून पाझरू लागले ! पाहता पाहता बाबा परिसरात प्रसिद्ध झाले. याचा उलट परिणाम झाला.
बाबांचे हितशत्रू वाढले आणि बाबांवर परस्त्रीचा आळ आणला गेला ! ही बातमी बाबांना समजताच बाबांनी नारायण गडाच्या पायथ्यासी धारदार विळ्याने स्वतःचे लिंग कापून टाकले. पायथ्यासी बाबा बेहोश पाहून काही शिष्यांनी त्यांना तात्काळ दवाखाण्यात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती सुधारल्यानंतर बाबांनी नारायण गड सोडायचा निर्णय घेतला आणि ते धुम्यागडावर म्हणजेच आताच्या भगवानगडावर येऊन आपले कार्य सुरु केले.
भगवानबाबांनी नैष्टिक ब्रह्मचर्य स्वीकारून कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजोत्थान आणि प्रबोधनाचे वृत्त धारण केले होते. बाबा गावोगाव जाऊन गोर-गरीब-वंचित-उपेक्षित-अज्ञानी लोकांचे प्रबोधन करू लागले.
उच्च-नीचता संपवा, जातीभेद थांबवा, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा असा उपदेश करत. अनेक कृतीशिल कार्यक्रमातून त्यांनी समाजसुधारणा कार्याची चुणूक समाजाला दाखवून दिली. बाबांची आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची हैद्राबाद येथे भेट झाली होती.
त्या भेटीत डॉ.आंबेडकरांनी बाबांसोबत डोंगरदऱ्यांतील लोकांमध्ये शिक्षण प्रसाराचे कार्य करण्याची आवश्यकता बोलून दाखवली. बाबांनाही शिक्षणाचे महत्व ठाऊक असल्याकारणाने पंचक्रोशीतील लोकांकडून वर्गणी, धान्य गोळा करून, डोक्यावर दगड जमा करून धौम्य गडाच्या पायथ्यासी शाळा बांधली.
परिसरातील गोर-गरीब, कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे सुरु केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि संतांच्या उपदेशाची जाण बाबांना असल्यामुळे ते कीर्तनातून "एक एक्कर जमिन विका पण मुले शिकवा" असा उपदेश करायचे.
याशिवाय अनेक गावातील कालबाह्य झालेल्या रूढी परंपरांच्या विरोधात कृतीशील कार्य केले. डोंगर-दऱ्यातील समाज दारू, तंबाखू, बांधावरून भांडणे यापासून दूर कसा राहील (?) यासाठी बाबा कीर्तनातून उपदेश करायचे. बाबांनी भगवानगड आणि पंचक्रोशीत गावोगाव नारळी साप्ताह सुरु केले. 'जेथे करावे कीर्तन |
तेथे सेवू नये अन्न॥' या तुकोक्तीप्रमाणे ते फक्त नारळ घेऊन लोकांना निर्व्यसनी रहा, आई-वडिलांची सेवा करा, शिक्षण शिका असा सरळ साधा उपदेश करायचे. बाबांनी परिसरातील अनेक गावच्या जत्रेतील गोहत्या, प्राणीहत्या सारख्या अमानुष रूढी परंपरा बंद केल्या. प्रसंगी बळी जाणाऱ्या गायीच्या गळ्याला चिकटून राहिले परंतु गोहत्या होऊ दिली नाही!
आज श्री संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विचार करतांना अनेक गोष्टींचा उल्लेख होणे अपेक्षित आहे. समाज व्यसनाधीन होत असून जातिवाद वाढतो आहे. धर्मसहिष्णुता ढासळत आहे. तेंव्हा, सर्वत्र कट्टरता सौम्य होऊन 'वसुधैव कुटुंबकम' भावना वृद्धिंगत होणे गरजेचे आहे.
तसेच वर्तमानात कीर्तन-प्रवचन करणाऱ्या धुरिणांनी संत वचनांचा केवळ व्यापार न करता आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो हे लक्षात ठेवावे! प्रबोधन करतांना केवळ विनोद आणि पैशावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे लोक 'कीर्तन केवळ धंदा झाला आहे!'
असे हिणवत आहेत. हे कुठेतरी थांबून आपण सर्वानीच समाजऋण फेडण्यासाठी आग्रही रहावे. असे झाल्यास कृतीशील समाजसुधारक संत श्री भगवान बाबांचे आपण पायिक म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे होऊ, अन्यथा सर्व केवळ देखावाच ! रामकृष्णहरी ! जय भगवान बाबा !
- प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये