पदवीधर मतदारसंघासाठी
मतदार मदत कक्ष कार्यान्वित
--------------
टोल फ्री १०७७, दूरध्वनी ०२४५२-२२६४०० उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ८ : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन, मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार असल्याची माहिती मदत कक्षप्रमुख तथा जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांनी दिली.
या निवडणुकीसाठी शुक्रवार (ता. २३) रोजी मतदान तर मंगळवार (ता. २७) रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील माहिती व मार्गदर्शन देण्याबरोबरच मतदारांच्या तक्रारी, संदेशांची नोंद घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे काम या कक्षामार्फत केले जाणार आहे. मतदारांना मदत कक्षाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०७७ , (०२४५२-२२६४००) हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती मदत कक्षाच्या कामकाजासाठी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समिती, परभणी येथील दोन सांख्यिकी सहायक आणि एका महसूल सहायकाची कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते रात्री ९.४५ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १०२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची निर्धारित वेळापत्रकानुसार सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत मदत कक्षात उपस्थिती राहणार आहे. दूरध्वनीवरून प्राप्त होणाऱ्या सर्व संदेश व विचारणांची तातडीने नोंदवहीत नोंद केली जाणार असून, मदत कक्षाला भेट देणाऱ्या नागरिकांचीही नोंद ठेवण्यात येणार आहे. प्राप्त संदेशांची माहिती वेळोवेळी मदत कक्षप्रमुख तथा जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक काळात कामकाजात कुचराई, निष्काळजीपणा किंवा आदेशाचे उल्लंघन झाल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३४ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
------------