
औरंगाबाद : गुंठेवारीसाठीही ‘वेटिंग’; एजन्सीकडे अडकल्या शेकडो फायली
औरंगाबाद - शहरातील गुंठेवारी (Gunthewari) भागातील डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे (Illegal Construction) नियमित (Continue) करण्याची मोहीम महापालिकेने (Municipal) हाती घेतली आहे. मालमत्ताधारकांना फायली (File) दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे, ती शुक्रवारी (ता. ३१) संपणार आहे. महापालिकेचे शहरातील किमान ५० हजार बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ चार हजार २१४ फायली दाखल झाल्या आहेत. दरम्यान, वास्तुविशारदांकडे शेकडो फायली पडून असून, नव्या फाईल स्वीकारण्यास अनेक जण नकार देत आहेत. सध्या जमा फाइली अंतिम झाल्यानंतर तुमचे अर्ज घेतले जातील, असे मालमत्ताधारकांना सांगितले जात आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने गेल्या चार महिन्यांपासून गुंठेवारीच्या फाईल स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. पण मालमत्ताधारकांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आत्तापर्यंत तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. आता ३१ डिसेंबरला फाईल दाखल करण्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळणार का? याविषयी मालमत्ताधारकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान गुंठेवारीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. महापालिकेने ५१ वास्तुविशारदांची नियुक्ती केली असली तरी एका एजन्सीमार्फत दररोज किमान दोन ते तीन फायली तयार केल्या जात आहेत.
हेही वाचा: दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी चार विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट
मालमत्ताधारकाने अर्ज केल्यानंतर जागेची मोजणी, सर्व्हेक्षण नकाशा, गुगल नकाशा तयार करून ती फाईल महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयापर्यंत पाठविण्यासाठी वेळ जात असल्याचे वास्तुविशारदांचे म्हणणे आहे. महापालिकेने डिसेंबर २०२० पर्यंतचे किमान ५० हजार बेकायदा बांधकामे नियमित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चार महिन्यात चार हजार फायली दाखल झाल्या आहेत व दोन हजार फायली मंजूर झाल्या आहेत. या गतीने काम झाल्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा फायली दाखल करण्यासाठी मुदतवाढ देऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
३९ कोटींचा मिळाला महसूल
महापालिकेकडे आत्तापर्यंत चार हजार २१४ फायली दाखल झाल्या आहेत. त्यातील दोन हजार ३७ फायली प्रशासनाने मंजूर केल्या आहेत तर ७८ फायली नामंजूर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या तिजोरीत ३९ कोटी दोन लाख ५८ हजार २२३ रुपये जमा झाले आहेत.
Web Title: Waiting For Gunthewari Illegal Construction Continue Municipal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..