वालसावंगीच्या सुरक्षेसाठी व्यापारी सरसावले
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची बैठक; अद्ययावत कॅमेरे बसविण्याच्या सूचना
धावडा, ता. २१ : आगामी काळातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वालसावंगी येथे चोरी तसेच अन्य अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पूर्वतयारी व विशेष दक्षता घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालयात सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची बैठक झाली. पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ अध्यक्षस्थानी होते. यात गावातील प्रमुख रस्ते तसेच दुकानांच्या परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरावर निगराणी ठेवण्याची सूचना करण्यात आली.
गावातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘ग्रामसंरक्षणा’साठी पुढाकार घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. बैठकीत बँक परिसरात किंवा गावात अनोळखी अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री दुकाने आणि घरांसमोरील दिवे सुरू ठेवावेत, अशी सूचना करण्यात आली. पशुधन मोकाट सोडू नये, तसेच बँकेतून किंवा दुकानातून मोठी रोख रक्कम काढताना व तिची हाताळणी करताना विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात व्यापाऱ्यांच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस वालसावंगी शहरातील लोकप्रतिनिधी, बँक व्यवस्थापक, सर्व लहान-मोठे व्यापारी, ग्रामस्थ, पोलिस कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते. गावातील शांतता व सुरक्षेसाठी सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी दिले.
...................
एपीके फाइल डाउनलोड करू नये
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या एपीके फाइल मोबाइलमध्ये डाउनलोड करू नयेत. तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल खात्यांना टू-स्टेप व्हेरिफिकेशनची सुविधा सुरू करून सुरक्षितता वाढवावी, असे आवाहन करण्यात आले.