पान ४ अँकर

पान ४ अँकर
Published on: 
कचऱ्यातून नवनिर्मिती; पालापाचोळ्यापासून ७०० किलो सेंद्रिय खताची निर्मिती योगेश्वरी महाविद्यालयाचा पर्यावरण संवर्धनाचा पॅटर्न; विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या श्रमातून फुलला प्रकल्प अंबाजोगाई, ता. २० (बातमीदार) ः केवळ चार भिंतींच्या आतून दिले जाणारे शिक्षण हे केवळ पुस्तकी असू शकते, मात्र जेव्हा शिक्षणाला निसर्ग संवर्धनाची आणि सामाजिक बांधिलकीची प्रत्यक्ष कृतीची जोड मिळते, तेव्हा त्याचे रूपांतर एका विधायक चळवळीत होते. अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेने वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेला मूर्त रूप देत असाच एक आदर्श आणि पर्यावरणपूरक पॅटर्न उभा केला आहे. संस्थेच्या विस्तीर्ण आवारात दररोज पडणाऱ्या पालापाचोळ्याची जाळपोळ न करता किंवा तो फेकून न देता, त्याचा अत्यंत कल्पकतेने वापर करून अवघ्या सात महिन्यांत तब्बल ७०० किलो उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय (नैसर्गिक) खत तयार करण्याची किमया संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी साधली आहे. हा प्रकल्प संपूर्ण विभागासाठी पर्यावरण संवर्धनाचे एक उत्तम मॉडेल ठरत आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये केवळ राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्येच नव्हे, तर पर्यावरणाविषयीची कृतज्ञता रुजावी, या हेतूने योगेश्वरी निसर्ग संवर्धन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या माध्यमातून जल, जमीन आणि जंगल या निसर्गाच्या मूलभूत घटकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आंतरिक जिव्हाळा निर्माण केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या परिसरातील पालापाचोळा गोळा करून त्यापासून नैसर्गिक खत निर्मितीचा अभिनव प्रकल्प हाती घेण्यात आला आणि त्यात प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. ------ दोन हजार वृक्षांची लागवड आणि कचऱ्याचे व्यवस्थापन मागील दोन वर्षांच्या कालावधीत संस्थेच्या विविध विभागांमध्ये मिळून सुमारे दोन हजार विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ लागवडच नव्हे, तर या सर्व वृक्षांचे अतिशय काटेकोरपणे संगोपनही करण्यात आले. यामुळे संपूर्ण संस्था परिसराने एका विस्तीर्ण हिरवाईचे रूप धारण केले आहे. मात्र, झाडांची संख्या आणि आकार वाढल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा आणि सुका कचरा जमा होत होता. या जैविक कचऱ्याची केवळ विल्हेवाट न लावता त्याचा पर्यावरणपूरक उपयोग करण्याची दूरदृष्टीची कल्पना संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी मांडली. ----- अशी राबविली संकल्पना या संकल्पनेनुसार संस्थेच्या विविध विभागांमध्ये मोठ्या लोखंडी जाळ्या तयार करून बसवण्यात आल्या. या जाळ्यांमध्ये कॅम्पसमध्ये पडणारा रोजचा पालापाचोळा संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रकल्पात महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विभागातील प्रा. अनिल नरसिंगे, प्रा. आदित्य कदम, सुजित विडेकर आणि विजय वल्लमवाड यांनी तांत्रिक पुढाकार घेतला. संस्थेतील कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दररोज एकत्रितपणे पालापाचोळा गोळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले. या गोळा झालेल्या पालापाचोळ्यावर नियमित पाणी टाकून नैसर्गिक पद्धतीने त्याचे विघटन होण्याची शास्त्रशुद्ध काळजी घेण्यात आली. ----- खताचा वापर संस्थेतच सर्वांच्या या सामूहिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून तब्बल सात महिन्यांत उत्कृष्ट दर्जाचे ७०० किलो नैसर्गिक (सेंद्रिय) खत तयार झाले आहे. विशेष म्हणजे, यासाठी रासायनिक प्रक्रियेचा वापर टाळण्यात आला आहे. तयार झालेले हे सर्व सेंद्रिय खत संस्थेच्याच आवारातील विविध वृक्ष, बागा आणि हरित क्षेत्रांच्या संवर्धनासाठी वापरले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com