जलसंधारणासाठी श्रमदानाची
लोकचळवळ उभी करा : कर्डिले
-----
नांदेड, ता. ६ : दुष्काळ आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेऊन श्रमदानाची व्यापक लोकचळवळ उभी करावी. प्रशासनाने केवळ नियोजनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून गावांचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
अर्धापूर तालुक्यातील डौर येथील नंदीग्राम पर्यटन केंद्रात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० कार्यशाळा आणि जिल्हास्तरीय दुष्काळ व पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले, माती-नाला बांध, जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने राबवावीत. गावांमध्ये लोकसहभाग वाढवून श्रमदानाला प्रोत्साहन द्यावे. चांगले काम करणाऱ्या गावांमध्ये मी स्वतः, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी श्रमदानात सहभागी होणार आहोत. आठवड्यातून किमान दोन ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न राहील.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा केवळ शासकीय उपक्रम न राहता लोकचळवळ बनावा. गावविकास, जलसंधारण, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक परिवर्तनासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी प्रशासन खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.