जलसंधारण, रोजगारनिर्मितीवर भर
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा परिषदेत कार्यशाळा
धाराशिव, ता. ३० (बातमीदार) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, भूजल फेरभरण, चारा व्यवस्थापन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि रोजगारनिर्मितीच्या कामांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवारी (ता. २९) विकसित भारत रोजगार व आजीविका हमी ग्रामीण योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील अध्यक्षस्थानी होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, यशदाचे राज्य प्रशिक्षक रवींद्र इंगोले आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके उपस्थित होते. कार्यशाळेत दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामस्तरावर करावयाच्या उपाययोजना, ग्रामीण रोजगारनिर्मिती, जलसंधारण आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. अध्यक्षा पाटील म्हणाल्या, की दुष्काळाचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, ग्रामपंचायती, गटविकास अधिकारी आणि ग्रामस्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. शेततळी, नाला खोलीकरण, भूजल फेरभरण आणि चारा व्यवस्थापनाची कामे स्थानिक गरजांनुसार प्राधान्याने हाती घ्यावीत.
रवींद्र इंगोले यांनी नैसर्गिक साधनसंपत्ती, पाण्याची गरज आणि स्थानिक रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन कामांचे नियोजन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. नीलेश काळे यांनी विविध योजनांचा समन्वय साधून गावांच्या गरजेनुसार कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले. तुकाराम भालके यांनी प्रास्ताविक केले. समाजकल्याण सभापती विश्वास कोकणे, अर्थ व बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, सदस्य, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि रोजगार सहायक उपस्थित होते. स्नेहल कदम, नागेश पाटील, प्रेमा चेडे, प्रफुल्ल बनसोडे, अश्विनी सौदागर, जितेंद्र म्हेत्रे, सुनीता चव्हाण आणि अवंतिका पारडे यांनी कार्यशाळेसाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन दत्तप्रसाद जंगम यांनी केले.
..................................................