पावसाळ्यातच ३४० गावांत पाणीटंचाईचे संकट

पावसाळ्यातच ३४० गावांत पाणीटंचाईचे संकट
Published on
पावसाळ्यातच ३४० गावांत पाणीटंचाईचे संकट -- आराखड्याची तयारी: विहीर अधिग्रहण व खोलीकरणाबाबत सदस्यांना विश्वासात घेण्याचे निर्देश --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने आतापासूनच ३४० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. बहुतांश गावांतील सरकारी विहिरींमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने पावसाळ्यातच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. आगामी काळात पावसाअभावी स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच टंचाई निवारणाचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिले. स्थायी समितीच्या बैठकीत मनोज गायके यांनी या मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ‘यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानावर परिणाम झाला असून, नुकताच काही भागांत पाऊस झाला असला तरी पुढील काळात पावसाची शाश्वती नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन आराखडा तयार करण्याची गरज आहे’, असे मत गायके यांनी व्यक्त केले. सध्या सुमारे ३४० गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून बैठकीत देण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी यापूर्वी अधिग्रहित केलेल्या विहिरींमधील पाणीसाठाही कमी झाला असल्याने पर्यायी उपाययोजनांची गरज असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले. यातही सिल्लोड, फुलंब्री, गंगापूर व छत्रपती संभाजीनगर तालुक्यांतील अनेक गावांत टंचाईची स्थिती आतापासूनच बिकट झाल्याचे सदस्यांनी बैठकीत सांगितले. --- समन्वयाने गावनिहाय अडचणी सोडवा टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरू करणे, विहीर खोलीकरण, बोअरवेल, आडवी बोअर तसेच अन्य पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करताना संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंचांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून गावनिहाय अडचणी समजून घेत नियोजन करावे, असे निर्देश अध्यक्ष गलांडे यांनी दिले. --- अनेक गावांत आठव्या ते दहाव्या दिवशी पाणी गावांना आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदावर आराखडा न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी भूमिका गायके यांनी मांडली. यावर आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक गाव व वाडी-वस्तीची गरज लक्षात घेऊन उपाययोजना निश्चित करण्याची सूचना अध्यक्षांनी केली. --- ‘जलजीवन’ची कामे निकृष्ट; गुणवत्ता तपासण्याची मागणी जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता तपासूनच कंत्राटदारांची देयके अदा करावीत, अशी मागणी सदस्यांनी केली. गंगापूर तालुक्यातील जलजीवन मिशनची बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधित गावांतील कामांची प्रत्यक्ष तपासणी करूनच देयके मंजूर करावीत, असे निर्देश अध्यक्षांनी दिले. जिल्हा परिषदेला नवीन योजनांसाठी १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचा योग्य वापर करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मंगळवारी (ता. १५) जलजीवन मिशनच्या कामांबाबत तालुकानिहाय बैठक बोलावल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com