पाण्याअभावी घरकुलाचे स्वप्न दूर
तालुक्यात मंजूर असलेल्या २१ हजार ८०० घरकुलांचे काम लांबणार
राम काळगे
निलंगा, ता. ३१ : निलंगा तालुक्यामध्ये विविध योजनेअंतर्गत जवळपास २१ हजार ८०० घरकुले मंजूर झाले असले तरी त्यातील सुरू झालेल्या साडेआठ हजार घरकुलाचे बांधकाम पाण्याअभावी धोक्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने घरकुलाचे बांधकाम आता लाभार्थ्यांना बंद ठेवावे लागणार आहेत. तालुक्यातील पात्र लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असले तरी बाजारातील साहित्याचे वाढलेले दर पाहता देण्यात येणाऱ्या रक्कमेत घरकुल पूर्ण होईल का? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
राज्य व केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेमध्ये घरकुल मंजूर केले जाते. त्यामध्ये रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा वेगवेगळ्या माध्यमातून घरकुलाची मंजुरी दिली जाते. निलंगा तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असून ग्रामपंचायत व गावाची संख्या अधिक आहे त्यामुळे तालुक्यात घरकुलाचे लाभार्थीही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या दुष्काळी परस्थिती गंभीर बनली असून गावात पाण्याचे स्रोत कमी होत चालले आहेत. पाणी राखून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून थेट कारवाया केल्या जात आहेत. शेती ऐवजी पिण्याला पाणी राखीव ठेवले जात आहेत. पाण्याची समस्या निर्माण झाल्याने सुरू असलेले साडेआठ हजार घरकुल बांधकाम प्रश्न निर्माण झाला आहे. ही बांधकामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात विविध योजनेतून २१ हजार ८३७ घरकुले मंजूर आहेत त्यापैकी ८ हजार ५०० घरकुले सुरू असून त्यातील काही कामांचा पहिला हप्ता पडला आहे तर काही घरकुलांना दुसरा हप्ता टाकण्यात आला आहे. त्यामुळे सुरू झालेले घरकुल बांधकामावर दुष्काळामुळे गंडातर आले आहे.
.........
मतदारसंघातील स्थिती
निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यांसाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी तब्बल २८ हजार ४२२ घरकुल मंजुर झाले आहेत. त्यामध्ये निलंगा तालुक्यात १५ हजार ८७८, शिरूर अनंतपाळ तालुका ६ हजार ५०७ तर देवणी तालुक्यात: ६ हजार ३७ घरकुले मंजूर आहेत. यातील काही घरकुलाची मंजूरी यापूर्वीच देण्यात आली आहे.
.......