पंधरा गावांत पाणीबाणी
२३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, ३७० विहिरी अधिग्रहित
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ४ : जिल्ह्यात पाणीसाठा अत्यल्प उरल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस बिकट होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईने डोके वर काढले असून ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. जिल्ह्यातील १५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. आगामी काळात टंचाईची ही स्थिती वाढतच जाणार असून पाणीटंचाईची भीषणता अधिक वाढण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
...... .............................
((चौकट))
टंचाईचे चटके
टंचाईचा घटक...सद्यःस्थिती...उपाययोजना
टँकरग्रस्त गावे...१५ गावे (धाराशिव, लोहारा, उमरगा तालुका)...धाराशिव तालुक्यात सर्वाधिक झळ
कार्यरत टँकर...१५ टँकर सुरू...नळाद्वारे पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा लांबली
अधिग्रहित विहिरी/बोअरवेल...३७० स्रोतांचे अधिग्रहण...महिनाभरात अधिग्रहित विहिरींची संख्या १८० वरून ३७० वर
जलप्रकल्प स्थिती...पाणीसाठा तळाला...लघु व मध्यम प्रकल्पांत अपुरा पाणीसाठा; शेततळी कोरडी
...... .............................
((चौकट))
धाराशिव तालुक्याला सर्वाधिक झळ
जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक तीव्रता धाराशिव तालुक्यात पाहायला मिळत आहे. धाराशिव तालुक्यातील कौडगाव बावी, करजखेडा, बोरखेडा, पळसप, नांदुर्गा, वाणेवाडी, जवळे दुमाला, येडशी, काजळा, खामगाव या १० गावांत टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तर लोहारा तालुक्यातील सास्तूर येथेही एक टँकर सुरू आहे. तसेच उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, बलसूर, आनंदनगर, पेठसांगवी चार गावांत टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. ज्या गावांमध्ये आधी ४ ते ५ दिवसांआड पाणी येत होते, तिथे आता नागरिकांना ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
...... .............................
((चौकट))
राखीव पाणीसाठ्यासाठी
गस्ती पथके आवश्यक
टंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि भीषण होऊ लागली आहे. विहिरी आटल्या असून बोअरवेलनेही तळ गाठला आहे. पुढील सात महिने जिल्ह्यासाठी अत्यंत कठीण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पांतील उपलब्ध ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवलेला असला, तरी पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. गस्ती पथके तैनात केलेली असली तरी रात्री होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखणे गरजचे आहे.