ऊस उत्पादक अडचणीत

ऊस उत्पादक अडचणीत
Published on: 
पाण्याअभावी १,२३९ हेक्टरवरील ऊस पिकाला फटका जळकोट, ता. १८ (बातमीदार) : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने साठवण तलावांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विद्युत जोडण्या तोडल्या आहेत. त्यातच पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. जळकोट तालुक्यात सुमारे एक हजार २३९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा फटका बसत आहे. साठवण तलावांतील पाण्यावर अवलंबून असलेल्या ऊस पिकाला आता पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, पिकाची वाढ खुंटत असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्याच्या वाढीसाठी नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो. मात्र, पाण्याची उपलब्धता घटल्याने लागवडीपासून केलेल्या खर्चावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांना आता पिकाच्या नुकसानीची चिंता सतावत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. ----- पाण्याअभावी अनेक ठिकाणी ऊस पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. लागवडीपासून आतापर्यंत खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च झाला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी. -पांडुरंग वाघमारे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com