Water Issue : पाणी भरायला नाथसागरावर जाऊ का? संतप्त नागरिकांचा सवाल

सिडको-हडको भागात १२-१३ दिवसांनंतरही नळाला पाणी आले नसल्याने हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
Water Supply Issue
Water Supply Issuesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - नागरिकांचे पाण्याविना हाल सुरूच असून, विशेषतः सिडको-हडको भागात १२-१३ दिवसांनंतरही नळाला पाणी आले नसल्याने हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, जुन्या शहरातील काही भागात तब्बल चार ते पाच तास नळ वाहतात, पण सिडको-हडकोला घडाळ्याच्या काट्यावर फक्त पाऊण तास पाणी दिले जाते.

सिडको एन-४ भागात तर आज कहर झाला. तब्बल ११ व्या दिवशी पाणी आले; पण ऐनवेळी वीज गेल्याने चार भांडेही पाणी भरता आले नाही. त्यामुळे आता पाणी भरायला आम्ही नाथसागरावर जायचे का? की इकडची घरेदारे विकून जिकडे पाणी धो- धो वाहते, तिकडे राहायला जायचे, असे संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

मार्च महिना सुरू झाल्यापासून शहरातील पाणी पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला. वारंवार पाइपलाइन फुटणे, तांत्रिक बिघाड व महापालिकेने घेतलेल्या शटडाऊनमुळे विस्कळित झालेला पाणीपुरवठा अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. सिडको-हडकोसह जुन्या शहरातील काही भागात तब्बल दहा-बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे.

त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अद्याप समोर आलेला नाही, तर दुसरीकडे महापालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये ताळमेळ नसल्याचे समोर येत आहे. त्यात आता समान पाणी वाटपाचा मुद्दा समोर आलेला आहे.

महापालिकेने चार वर्षांपूर्वी शहरात समान पाणी वाटप करण्याची घोषणा केली होती, पण ती अद्याप कागदावरच आहे. जुन्या शहरातील काही भाग, गारखेडा परिसर, नळाला तब्बल चार ते पाच तास पाणी येते. नागरिकांचे पाणी भरणे झाल्यानंतर रस्त्यावरून पूर आल्यागत पाणी वाहते.

एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र सिडको-हडको भागात पाऊण तासाच्या आत नळाचे पाणी बंद केले जाते. अनेकांची एक हजार लिटरची टाकी देखील एवढ्या वेळेत भरत नाही आणि पुन्हा नळाला केव्हा पाणी येईल, याचा नेम नाही.

सिडको एन-४ ला गुरुवारी तब्बल ११ व्या दिवशी पाणी आले. नेमके याचवेळी लाइट गेली. ऐनवेळी वीज गेल्याने चार भांडेही पाणी भरता आले नाही. त्यामुळे नागरिकांचा आणखीच संताप वाढला. महावितरण आणि मनपाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

  • सिडको एन-४मध्ये अकराव्या दिवशी पाणी आले आणि दहा मिनिटांत वीज गुल

  • सिडको-हडकोत ४५ मिनिटे येतात नळ, जुन्या शहरात मात्र पाच तास धो-धो

  • इकडची घरे विकून तिकडे राहायला जायचे का? नागरिकांचा संतप्त सवाल

दररोज २० एमएलडीचा फटका

छत्रपती संभाजीनगर - शहराला तात्पुरता दिलासा देण्यासाठी टाकण्यात आलेली ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन २४ तास वगळता गेल्या १३ दिवसांपासून बंद आहे. एकीकडे नागरिकांचे पाण्याविना हाल सुरू असताना दुसरीकडे ही पाइपलाइन बंद असल्याने दररोज २० एमएलडी पाण्याचा फटका बसत आहे. नवी ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वारंवार फुटत आहे.

२२ मार्च ते ४ एप्रिल या १५ दिवसांत फक्त एक दिवस या जलवाहिनीतून पाणी मिळाले. मंगळवारपासून (ता. एक) पुन्हा ही जलवाहिनी बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाणीटंचाईचा फायदा टँकर लॉबी घेत आहे. सर्वत्र टॅंकरचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे शहरातील पाणीटंचाईला जीवन प्राधिकरण, २५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम करणारा कंत्राटदारच जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्येक उन्हाळ्यात सिडको-हडको भागातील नागरिकांच्या डोळ्यांत पाण्यासाठी पाणी येते. त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाकडे कुठलेही नियोजन नाही. नेहमी याच भागावर अन्याय केला जातो.

- शिवाजी दांडगे, माजी नगरसेवक.

एन-४ परिसरात गुरुवारी पाणी सोडले त्यावेळी लाइट गेली. त्यामुळे आम्ही पाणीपुरवठा बंद केला. आता या भागात शुक्रवारी (ता. चार) सकाळी पाणी देणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर समान पाणी वाटपाचा विचार होऊ शकतो.

- के.एम. फालक, कार्यकारी अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com