ABD26J81734 ः पान १ फ्लायर
----
जलसंवर्धनाचे सीमोल्लंघन! पाण्याचा पुनर्वापर करण्याचा घेऊया नवा संकल्प
गणेश तारळेकर : सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १९ : आज दसरा. एकमेकांना आपट्याची पाने देऊन ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ असा संदेश देण्याचा आणि चांगल्या विचारांचे सीमोल्लंघन करण्याचा हा सण. निसर्गाने आपल्याला दिलेले सर्वांत मौल्यवान सोने म्हणजे पाणी आहे; म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले जाते. हवामान बदल, एल-निनोचा लहरीपणा, वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे आता खऱ्या अर्थाने जलसंवर्धनाचे सीमोल्लंघन करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी घरातल्या घरात पाण्याचा पुनर्वापर हा एक अत्यंत प्रभावी उपाय पुढे आला असून, याद्वारे पिण्याच्या पाण्याची बचत करणे शक्य आहे.
घरात लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी जवळपास ५० टक्के पाणी हे शौचालयाचे फ्लशिंग आणि साफसफाईसाठी वापरले जाते. तिथे या पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर केल्यास, पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा वापर ३० ते ५० टक्क्यांनी कमी होतो. यामुळे घरगुती स्तरावर पाण्याचे बिल लक्षणीयरीत्या कमी होऊन पैशांची मोठी बचत होते. तसेच, गटारात जाणारे पाणी कमी झाल्यामुळे स्थानिक प्रशासनावर सांडपाणी व्यवस्थापनाचा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर येणारा ताणही मोठ्या प्रमाणावर हलका होतो.
ही सिस्टीम घरात बसवण्याचा सुरवातीचा खर्च थोडा जास्त वाटत असला तरी घर बांधकामाच्या अंदाजपत्रकात (बजेटमध्ये) या खर्चाचा आधीच समावेश केल्यास भविष्यात तो अत्यंत फायदेशीर ठरतो. या प्रणालीच्या उभारणीसाठी शहर पातळीवर कुशल व तांत्रिक कारागिरांना एकत्रित प्रशिक्षण दिल्यास, प्रत्येक नवीन घर बांधकामात पाणी पुनर्वापर सिस्टीम बसवणे अधिक सोपे होईल.
-----
पुनर्वापर कसा करायचा?
ड्युअल प्लंबिंग सिस्टीम : नवीन घर बांधताना दोन स्वतंत्र पाइपलाइन टाकणे. एक पिण्याच्या पाण्यासाठी आणि दुसरी ग्रे-वॉटर गोळा करून ती शौचालयाच्या फ्लशिंगला जोडण्यासाठी.
साधी पद्धत : वॉशिंग मशीनमधून निघणारे शेवटच्या टप्प्यातील पाणी थेट गटारात न सोडता एका टाकीत किंवा बादलीत गोळा करून, त्याचा वापर फरशी पुसण्यासाठी किंवा बागकामासाठी करणे.
------------
ग्रे-वॉटर आणि ब्लॅक-वॉटर म्हणजे नक्की काय?
ग्रे-वॉटर : अंघोळ, वॉश बेसिन आणि कपडे धुण्याच्या यंत्रातून बाहेर पडणारे सांडपाणी. यात साबण आणि थोडेफार कण असतात. परंतु, अतिनील किरणे आणि सूक्ष्म पडद्यांच्या माध्यमातून या पाण्यावर सोपी प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवता येते.
ब्लॅक-वॉटर ः शौचालयातून बाहेर पडणारे सांडपाणी. यात हानिकारक जिवाणू असल्याने त्यावर घरातल्या घरात प्रक्रिया करणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नसते. त्यामुळे ते थेट गटारात किंवा सेप्टिक टँकमध्ये सोडले जाते.
----
केवळ शासनावर अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून घरगुती सांडपाण्याचा पुनर्वापर करणे काळाची गरज आहे. पाणीबाणी उंबरठ्यावर असताना, आज दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्येकाने जलसंवर्धनाचा संकल्प करावा.
- प्रभाकर शेटे, प्रवर्तक, जलजागृती अभियान, माजलगाव