आश्वासनांचा पाऊस नको, गावांना प्रत्यक्ष पाणी द्या

आश्वासनांचा पाऊस नको, गावांना प्रत्यक्ष पाणी द्या
Published on: 
बारा गावांसाठी प्रस्तावित पाणीयोजनेत अडथळे -------------------- भोगाव सर्कलमधील पाणीप्रश्नावर प्रशासनास धारेवर धरले जिंतूर, ता. ४ (बातमीदार) ः तालुक्यातील भोगाव सर्कलमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोगाव अडगाव, वस्सा परिसरातील १२ गावांसाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. वारंवार आश्वासने देण्याऐवजी योजनेतील अडथळे दूर करून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा, तोपर्यंत टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी उपलब्ध करून द्यावे अशी ठाम भूमिका जि. प. सदस्य कृष्णा देशमुख यांनी मांडली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत १२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना तांत्रिक अडचणी, अपूर्ण कामे, निधीची उपलब्धता आणि वीजपुरवठ्याचे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली. योजनेची अंमलबजावणी रखडण्यामागील कारणांचा शोध घेऊन संबंधित विभागांनी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाने आधीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा लताताई वाकळे, उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हा परिषद सदस्या दीपाली चौधरी, सदस्य माणिकराव हरकळ यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित गावांचे ग्रामसेवक व पाणीपुरवठा कर्मचारीही बैठकीत सहभागी झाले. --- समन्वयाअभावी काम रखडू नये पाणीपुरवठा योजनेच्या कामात पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण आणि ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची आहे. एका विभागाचे काम अपूर्ण राहिल्याने दुसऱ्या विभागाची कार्यवाही थांबू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. प्रलंबित कामे आणि तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून योजनेला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. --- योजना पूर्ण होईपर्यंत टँकर पुरवा १२ गावांची पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणी घरापर्यंत पोचण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, यासाठी गरजू गावांची तातडीने पाहणी करून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. आता बैठकीतील चर्चेचे रूपांतर प्रत्यक्ष कार्यवाहीत कितपत होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.