
हर्सूल तलावासाठी बांधणार जलशुद्धीकरण केंद्र
औरंगाबाद - शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने हर्सूल तलावातील पाणी उपसा वाढविला आहे. पण वाढीव पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्याच्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे हर्सूल तलावाचे गढूळ पाणी आम्हाला नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. आता तलावातील वाढीव पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पाच एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारावे, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार सुमारे दोन कोटी ७० लाख रुपये महापालिकेला खर्च करावे लागतील.
महापालिकेतर्फे शहरातील १४ ते १५ वॉर्डांना हर्सूल तलावातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी नैसर्गिक उताराने महापालिकेला पाच ते साडेपाच एमएलडी पाणी मिळत होते. पण यंदा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना हर्सूल तलावातील पाणी उपसा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाच एमएलडीपर्यंत पाणी उपसा वाढविण्यात आला. हे पाणी जटवाडा रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रातून हर्सूल कारागृह, हरसिद्धीमाता येथी पाण्याच्या टाकीवर आणले जात आहे. तसेच शहागंज येथील पाण्याच्या टाकीवरून विविध भागांना दिले जात आहे.
मात्र हर्सूल तलावाचे पाणी शुद्ध नसल्याची ओरड नागरिकांकडून सुरू आहे. या पाण्याचे नमुने नागरिकांसमोर तपासण्यात आले. त्या पाणी शुद्ध असल्याचे समोर आले. असे असले तरी नागरिकांकडून विरोध कायम आहे. दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी (ता. १८) पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यात त्यांनी हर्सूल तलावातील वाढीव पाण्यासाठी स्वतंत्रपणे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारावा, असे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. हे अंदाजपत्रक सुमारे दोन कोटी ७० लाख रुपयांचे असू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
प्रेशर फिल्टरला स्थगिती
हर्सूल तलावातून पाण्याचा उपसा वाढल्यामुळे वाढीव पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन प्रेशर फिल्टर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी एक कोटी ७० लाख रुपये खर्च अपेक्षीत होता. आता जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्यामुळे बैठकीत प्रेशर फिल्टर खरेदीच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.