वॉटर फिल्टर प्लांटमधील पाण्याचा अपव्यय रोखा

वॉटर फिल्टर प्लांटमधील पाण्याचा अपव्यय रोखा
Published on: 
वॉटर फिल्टर प्लांटमधील पाण्याचा अपव्यय रोखा ----- जिल्हाधिकारी कर्डिलेंचे निर्देश ः पाणी वाचवा, पुनर्वापर वाढवा, प्लांटचे सर्वेक्षण करणार --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ११ : संभाव्य अल्-निनोचा प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्रक्रियेदरम्यान वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करावा, ते जमिनीत मुरवून भूजल पुनर्भरणाला हातभार लावावा, तसेच पाण्याच्या गुणवत्तेनुसार त्याचा दैनंदिन कामांसाठी वापर करावा, असे निर्देश त्यांनी वॉटर फिल्टर प्लांटचालकांना दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे उत्पादन व विक्री करणाऱ्या वॉटर असोसिएशनच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत पाणीबचत, पाण्याचा अपव्यय रोखणे आणि पुनर्वापराच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात एक लिटर पॅकेज्ड पाण्याचे उत्पादन करणारे युनिट मर्यादित आहेत. मात्र, २० लिटरच्या जारमधून फिल्टर पाण्याची विक्री करणारे सुमारे ३५० ते ४०० युनिट कार्यरत आहेत. या युनिटमध्ये पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नांदेड शहर आणि परिसरातील सर्व परवानाधारक तसेच विनापरवानाधारक वॉटर फिल्टर प्लांटचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत. ------- शोषखड्डे तयार करा वॉटर फिल्टर प्लांटमधून बाहेर पडणारे पाणी शोषखड्ड्यांद्वारे जमिनीत मुरविल्यास भूजल पुनर्भरणास मदत होऊ शकते. तसेच वाया जाणारे पाणी मोठ्या टाक्यांमध्ये साठवून, त्याची गुणवत्ता तपासल्यानंतर आणि आवश्यक खबरदारी घेऊन कपडे धुणे, भांडी घासणे व परिसराची स्वच्छता यांसारख्या कामांसाठी वापरता येऊ शकते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन टंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करणे शक्य होईल. ---- पाणीबचत ही सामाजिक जबाबदारी आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. वॉटर फिल्टर प्लांटचालकांनी प्रक्रिया करताना होणारा पाण्याचा अपव्यय रोखून पुनर्वापरासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीबचतीसाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com