सकाळी गारवा, दुपारी उन्हाचा चटका
-
बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम; ताप, घसादुखीसह श्वसनाचे रुग्ण वाढले
हिंगोली, ता. १४ : सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा, तर दुपारी उन्हाचा वाढणारा कडाका अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ- उतार होत असल्याने सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे शासकीय आणि खासगी रूग्णालयाच्या ओपीडीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने चढ- उतार होत असून, सध्या कमाल ३१ तर किमान १६ अंश तापमान नोंदविल्या जात आहे. सकाळच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून, दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढत आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तापमानात बदल होत आहेत. या वातावरणामुळे घशात खवखवणे, गिळताना त्रास होणे, नाक वाहणे, वारंवार शिंका येणे, कोरडा खोकला आणि ताप अशा तक्रारी घेऊन नागरिक डॉक्टरांकडे जात आहेत. काही रुग्णांमध्ये खोकला कमी होण्यासाठी अधिक कालावधी लागत असल्याचेही डाॅक्टरांचे म्हणणे आहे. हवामानातील बदलामुळे सध्या नागरिकांमध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अर्थात श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील संसर्ग, तसेच लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अर्थात फुप्फुसे आणि श्वसननलिकेतील संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांचाही समावेश आहे. ताप, अंगदुखी, उलटी आणि मळमळ ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत. त्यामुळे सुरवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
----------------
अशी घ्या आरोग्याची काळजी
बदलत्या वातावरणात थंड पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो कोमट किंवा गरम पाणी प्यावे. घशात खवखव किंवा दुखत असल्यास कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. धूळ आणि धुरापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा. आवश्यकतेनुसार वाफ घ्यावी. वैयक्तिक स्वच्छता राखावी आणि आजारी असल्यास पुरेशी विश्रांती घ्यावी. ताप किंवा खोकला दीर्घकाळ कायम राहिल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
---------------
जिल्हा रुग्णालयाची ओपीडी दीडशेनी वाढली
हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची दररोजी ओपीडी सरासरी सातशे असते. परंतु, वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ओपीडी आठशे ते साडेआशेंवर पोचली आहे. जवळपास शंभर ते दीडशें रूग्णांची भर जिल्हा सामान्य रूग्णालयात पडली असून, खासगी रूग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. गत पंधरा दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. अशा वातावरणामुळे दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास जाणवत आहे. या शिवाय रुग्णांमध्ये अबालवृद्धांचा अधिक समावेश आहे.
------------------
(((कोट)))..
बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक त्रास दम्याचे रुग्ण, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. सकाळी-रात्रीचा गारवा आणि दुपारचे कडक ऊन यामुळे श्वसनमार्गावर परिणाम होऊन ॲलर्जी, सर्दी, खोकला आणि दम्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे धूळ, धूर आणि थंड पदार्थ टाळावेत. नियमित औषधोपचार घ्यावेत आणि त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. पवनकुमार गिरी,
छाती, हृदयरोग व ॲलर्जीतज्ज्ञ, हिंगोली
-------------------
सध्या तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याच्या रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. सकाळी व रात्री थंडीपासून बचाव करावा. थंड हवा, धूळ आणि धुराचा संपर्क टाळावा. सर्दी, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
- डाॅ. संदीप शिंदे,
जनरल सर्जन, हिंगोली