व्हे पावडर तस्करीप्रकरणी दिलीप हंबर्डे अखेर गजाआड
बनावट दुधाच्या रॅकेटवर आष्टी पोलिसांची कारवाई
आष्टी, ता. ३१ (बातमीदार) : दुधात भेसळ करून कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या अवैध वाहतूक व साठवणुकीप्रकरणी आष्टी पोलिसांनी दिलीप जानदेव हंबर्डे (वय ५५, रा. आष्टी) याला रविवारी (ता. ३०) मध्यरात्री अटक केली. यापूर्वी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हंबर्डे याचे नाव समोर आले असून, आष्टी-जामखेड परिसरातील दूध संकलन केंद्रे व डेअऱ्यांमध्ये भेसळयुक्त दूध निर्मितीची साखळी कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
१८ ऑगस्ट रोजी रात्री आष्टी-जामगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन्स व हर्षद हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचून एमएच-१३ सीयू-४१४१ महिंद्रा पिकअपमधून २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या व्हे पावडर जप्त केली होती. चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून आष्टी शहरातील बाळासाहेब जाधवर यांच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमधून आणखी २५ गोण्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ७२ गोण्या व्हे पावडर आणि वाहनासह २ लाख ६९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी अजय भगवान गाडे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील विविध कलमांनुसार सुशांत ऊर्फ बाबू गोपाळघरे, हरिदास गोपाळघरे आणि कैलास हंबर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सुशांतला १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्या कसून चौकशीत व्हे पावडरचा पुरवठा दिलीप हंबर्डे याच्या सांगण्यावरून होत असल्याचे समोर आल्याने त्याला सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.
----------
आठ दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी दिलीप जानदेव हंबर्डे याला सोमवारी (ता. ३१) आष्टी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने हंबर्डे याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जप्त व्हे पावडरचा पुरवठा नेमका कोणत्या डेअऱ्यांना केला जात होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.