फोटो क्रमांक- OSM26B07136
धाराशिव ः स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित चोरट्यांकडून जप्त केलेल्या पवनचक्कीच्या तारांची बंडले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी.
..............................
पवनचक्कीच्या तारांची चोरी
उघड; पाच संशयित अटकेत
धाराशिव, ता. ६ (बातमीदार) : पवनचक्कीच्या तारांची चोरी करणाऱ्या पाच संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून तांब्याची व ॲल्युमिनियमची तार, पिकअप वाहन आणि दोन दुचाकी असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. ५) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मांडवा (ता. वाशी) शिवारात एका वाहनात चोरीच्या तारांचे बंडल भरले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी पिकअपमध्ये आठ ते दहा जण तारांचे बंडल भरताना दिसले. पोलिसांना पाहताच त्यातील काही जण पळून गेले. पाठलाग करून श्याम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मांडवा), लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, ह. मु. मांडवा), आकाश श्रीरंग पवार, पवन कालिदास काळे (दोघेही रा. वरुडा, ता. धाराशिव) आणि पिकअपचालक अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत ही तार तेरखेडा, इंदापूर व ढोकी शिवारातील पवनचक्कीच्या नवीन खांबांवरील वीजवाहिन्या कापून चोरल्याचे संशयितांनी सांगितले. तसेच धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला चोरीच्या तारांची विक्री केल्याची माहिती आकाश पवार याने दिली. त्यानंतर पोलिसांनी जाकेर शेख यालाही ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संशयितांकडून चोरीच्या तारा घेतल्याचे सांगितले.
संशयितांना येरमाळा पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तपासात चार गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून तांब्याची तार, ॲल्युमिनियम तार, पिकअप व दोन दुचाकी असा ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्याम शिंदे हा नळदुर्ग पोलिस ठाणे हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यात फरारी आरोपी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक निरीक्षक सचिन खटके यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.