थंडीची चाहूल; ज्वारी, हरभरा
पिकांना पोषक वातावरण
धाराशिव, ता. १५ : ऑक्टोबर हीटचा तडाखा ओसरल्यानंतर शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात घट होत आहे. वातावरणातील या बदलामुळे जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा वाढल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी स्वेटर, जॅकेट यांसारखे उबदार कपडे वापरण्यास सुरवात केली आहे. रविवारी जिल्ह्यातील किमान तापमान १५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
सायंकाळनंतर गार वारे वाहू लागल्याने चहाच्या टपऱ्यांवर गर्दी वाढत आहे. लहान मुले कानटोप्या आणि स्वेटर वापरताना दिसत आहेत. सकाळी व्यायाम आणि चालण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली असून, नागरिक थंडीतील फिरण्याचा आनंद घेत आहेत.
-----
रब्बी पिकांसाठी थंडी पोषक
वाढती थंडी कांदा, ज्वारी आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी पोषक ठरत आहे. सध्या शेतामध्ये कांद्याचे पीक वाढीच्या अवस्थेत असून, कांद्याची फुगवण होण्यासाठी थंड हवामान अनुकूल असल्याचे शेतकरी सांगतात. दुष्काळी परिस्थितीत रब्बी ज्वारीचे पीक तग धरण्यासाठीही थंडी फायदेशीर ठरत आहे. या हवामानामुळे पिकांची वाढ चांगली होण्यास आणि कांद्याची प्रत सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. आगामी काळात किमान तापमानात आणखी घट झाल्यास रब्बी पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.