थंडीशी दोन हात करताना
घ्या आरोग्याची काळजी
थंडी, बदलत्या हवामानामुळे हिवाळ्यात सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याच्या समस्या नव्हे तर त्वचेच्या समस्या बहुतांश जणांना भेडसावतात. त्यासाठी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे तर महत्त्वाचे पण रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. कारण शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास आरोग्याच्या समस्या अधिक तीव्रतेने जाणवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करायलाच हवा.
गूळ-शेंगदाणे ः हिवाळ्यात गूळ-शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि अनेक पोषक घटक असतात. जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. तर गुळामध्ये लोह आणि खनिजे असल्याने त्याचेही सेवन करणे चांगले. त्यामुळे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, तसेच चिक्कीमध्ये गूळ, शेंगदाण्यासह तिळाचा वापर केला पाहिजे. तसेच च्यवनप्राश खूप फायदेशीर. कारण यात आवळ्यासह विविध औषधी वनस्पतींचा समावेश असतो. च्यवनप्राशमधील पोषक घटक रोगप्रतिकारक यंत्रणेच्या सामान्य कार्यासाठी मदत करू शकतात. तसेच त्यातील काही घटक पचनासाठीही उपयुक्त ठरतात.
आवळा ः आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असते. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्मही असल्याने त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीरच. हिवाळ्यात रोज एक ताजा आवळा खाल्ल्यास उत्तम. नाही तर आवळ्याचा रस किंवा मुरांबा, आवळा घालून केलेली चटणी, आवळ्याचे लोणचे अशा पदार्थांचा आहारात समावेश करता येतो.
अंजीर ः रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अंजीर खाणे फायदेशीर आहे. अंजीरमध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोहसारखे पोषक घटक असल्याने ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. हिवाळ्यात एका ग्लास दुधात दोन ते तीन अंजीर घालून उकळून घ्यावे. दूध आणि अंजीरमधून शरीराला विविध पोषक घटक मिळतात. थंडीच्या दिवसांत शरीराची रोगप्रतिकार शक्तीसाठी दूध आणि अंजीर यासोबत काही पौष्टिक पदार्थ घेतल्यास चांगला फायदा होऊ शकतो. विशेषतः सुका मेवा, बिया आणि नैसर्गिक मसाल्यांचा समावेश करा.
बदाम आणि अक्रोड ः भिजवलेले बदाम आणि एक अक्रोड घेतले पाहिजे. यामधून चांगले फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि खनिजे मिळतात.
भोपळ्याच्या बिया आणि जवस ः एक चमचा भोपळ्याच्या बिया किंवा जवस घ्या. यात झिंक, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मिळतात.
हळद ः एक ग्लास दुधात चिमूटभर हळद घालून चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर थोडे कोमट झाल्यानंतर प्यावे. हळदीमध्ये दाहशामक गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी चांगलेच.
आले आणि काळी मिरी ः आहारात मर्यादित प्रमाणात या दोन्हीचा समावेश केला पाहिजे. थंडीमध्ये उबदारपणा जाणवण्यास मदत होते.
खजूर आणि मनुका ः एक खजूर आणि ५-६ मनुका घेऊ शकता. यामुळे ऊर्जा आणि काही खनिजे मिळतात. रात्री पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी हे पाणी उपाशीपोटी घेतल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
त्वचा कोरडी पडणे
थंडीच्या दिवसांत हवेतील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या अनेकांना भेडसावते. तसेच कोरडेपणा वाढल्याने ओठ फुटणे आणि त्वचा निस्तेज होणे यासारख्या समस्या वाढतात. थंडीत त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी.
- कोमट पाण्याचा वापर : खूप गरम पाण्याने अंघोळ किंवा चेहरा धुणे टाळले पाहिजे. कारण यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होते. त्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे फेसवॉश किंवा साबण वापरताना सल्फेट-मुक्त किंवा क्रिम-बेस्ड माइल्ड क्लिंजर निवडा. जास्त फेसाळणारे फेसवॉश त्वचा अधिक कोरडी करतात. त्यामुळे ते टाळले पाहिजे.
- मॉइश्चरायझरचा योग्य वापर ः अंघोळ केल्यानंतर किंवा चेहरा धुऊन झाल्यावर त्वचा पूर्ण कोरडी न करता, थोडी ओलसर असतानाच त्यावर चांगले मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. मॉइश्चरायझर खरेदी करताना त्यात सेरामाइड्स (Ceramides), ह्यूरोलॉनिक ॲसिड (Hyaluronic Acid), ग्लिसरीन किंवा शी बटर (Shea Butter) असलेले प्रॉडक्ट्स निवडा.
- ओठ, हाता-पायांची काळजी ः ओठ फुटू नयेत म्हणून चांगल्या गुणवत्तेचा लिप बाम किंवा लिप बटरचा सतत वापर केला पाहिजे. हात धुतल्यानंतर प्रत्येक वेळी हँड क्रीम लावा आणि रात्री झोपण्यापूर्वी पायांना मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावून मोजे घालणे फायदेशीर ठरते.
- सनस्क्रीन विसरू नका ः हिवाळ्यात ऊन कमी जाणवत असले तरी सूर्याची अतिनील किरणे (UV rays) त्वचेला हानी पोचवू शकतात. त्यामुळे घराबाहेर पडताना ३० किंवा त्याहून अधिक SPF असलेले सनस्क्रीन लावले पाहिजे.
- आरोग्याकडे लक्ष द्यावे ः थंडीत तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
- पौष्टिक सकस आहार : आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, रताळी तसेच तूप, सुकामेवा आणि फ्लॅक्स सीड्सचा (अळशी) समावेश करा, जे त्वचेला आतून पोषण देतात.