कुटुंबीयांसह स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या
राज्यमंत्री मेघना साकोरीकर-बोर्डीकर; धाराशिव येथे मेळावा
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १४ ः आगामी काळात दुष्काळाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा संकटमय परिस्थितीत महिलांनी खचून न जाता अत्यंत खंबीरपणे कुटुंब व्यवस्था सांभाळावी आणि स्वतःच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर-बोर्डीकर यांनी धाराशिव येथे केले.
तुळजापूर शक्तिपीठ ते माहूर भक्तीपीठ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत येथे आयोजित नारीशक्ती संवाद कार्यक्रमात त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील उपस्थित होत्या.
बोर्डीकर म्हणाल्या, की मराठवाड्याला दुष्काळाच्या समस्येला दरवेळेस मोठा फटका सहन करावा लागतो. या येणाऱ्या संकटाला कुटुंबाचा कणा असलेल्या स्त्रीनेच धैर्याने व खंबीरपणे पुढे नेण्याची गरज आहे. दुष्काळाचे संकट ही केवळ एकाची नसून आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे समजून सर्वांनी मिळून याला सामोरे जावे. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक ताणामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, यावर नारीशक्ती संवाद यात्रेतून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. विवाहांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळ्यांचा मार्ग स्वीकारावा. यासाठी धर्मादाय आयुक्तांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले.
........
((पॉईंटर))
शासनाकडून महत्त्वाचे निर्णय
- कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरच तातडीचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
- जन्मापासूनच मुलींच्या भविष्याची काळजी आपले सरकार घेत आहे. जलसाक्षरता, पाण्याचे महत्त्व आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय उभारणीत या काळात कशी मदत करता येईल, यावर भर दिला जाईल.
- सेवा संकल्प अभियानांतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिरांमधून दुर्धर आजारांवर शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मोठ्या रुग्णालयांपर्यंत सर्व आरोग्य सुविधा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
.........
धाराशिव ः सेवा संकल्प अभियानांतर्गत येथे आयोजित नारीशक्ती संवाद कार्यक्रमात उपस्थित ग्रामीण भागातील महिला.
फोटो क्रमांक ःOSM26B07191