महिलांच्या सबलीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन आवश्यक उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर.
गंगापूर बातमीदार ता.१
रामेश्वर अमृते.
महिला आर्थिक विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कार्यरत असलेल्या तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र गंगापूरची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ता. ३० बुधवार रोजी येथील दिपाली लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महिलांनी उद्योग-व्यवसायात पुढे येत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी जान्हवी शेखर यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून इतनी शक्ती हमें देना दाता या प्रार्थनेने सभेची सुरुवात करण्यात आली. साधन केंद्राच्या व्यवस्थापक सुनिता सहाने यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, गंगापूरचे स. पो.निरीक्षक विनायक पाटील, नगराध्यक्ष संजय जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर दत्तात्रय राजपूत,तालुकाकृषी अधिकारी बापूराव जायभाये,नगरसेविका सुवर्णा जाधव तसेच उपजिल्हा रुग्णालय गंगापूरचे आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होत्या. साधन केंद्राच्या अध्यक्षा सुरेखाताई उदे, सचिव नंदाताई ठोंबरे, उपाध्यक्ष देवकी उचित आणि कोषाध्यक्ष जाणकाबाई जाधव यांच्यासह पदाधिकारी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते साधन केंद्राच्या १७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी जान्हवी शेखर यांनी महिलांना उद्योग-व्यवसाय आणि सुरक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन करत भविष्यात तेजस्विनी साधन केंद्रासोबत संयुक्त उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी महिलांना मायक्रो एंटरप्राइज लोन, सब प्रोजेक्ट आणि व्यवसायाबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच कृषी अधीक्षक दीपक गवळी यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.सभेच्या यशस्वीतेसाठी लेखापाल विशाल टाके, सहयोगिनी विजया कसाने, नसरीन पठाण, प्रमिला कांबळे आणि मनिषा दारून्टे यांनी अथक परिश्रम घेतले. या वार्षिक सभेस सर्व कार्यकारिणी महिला, साधन केंद्राचा स्टाफ, प्रभाग संघ प्रनिधी आणि मोठ्या संख्येने बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
फोटो ओळ : तेजस्विनी घटसाधन केंद्राच्या १७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करताना मान्यवर.