महिलांनी स्वकर्तृत्वावर पुढे यावे ः बोर्डीकर
गेवराई, ता. २० (बातमीदार) ः महिलांनी लहान-मोठ्या उद्योगांतून स्वकर्तृत्वावर उभे राहावे, उद्योग-व्यवसायासाठी निधी देण्याची जबाबदारी सरकारची राहील. तुम्ही पुढे या, मी आणि आमचे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही मंत्री मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी (ता. १६) गेवराई येथे दिली.
गेवराई येथील भाजप कार्यालयात आयोजित आरोग्य सेवा संकल्प अभियान आणि नारी शक्ती संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, भाजप नेते बाळराजे पवार, माजी जि. प. सभापती युद्धाजीत पंडित, उपनगराध्यक्षा रेवती घुंबार्डे आणि प्रा. पी. टी. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
संभाव्य दुष्काळ लक्षात घेता पाण्याची काटकसर करण्याचे आवाहनही बोर्डीकर यांनी केले. आरोग्य राज्यमंत्री या नात्याने गेवराई शहरातील कुटुंबांच्या आरोग्यासाठी आणि दर्जेदार सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा शब्दही बोर्डीकर यांनी दिला. याप्रसंगी बाळासाहेब सानप, बाबा पिसाळ, ॲड. भगवानराव घुंबार्डे, राजेंद्र राक्षसभुवनकर यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुशिल टकले यांनी, तर आभार ॲड. राजेंद्र राक्षसभुवनकर यांनी मानले.