((एक अँकर))
........
सातबारावर नाव नसले तरी महिलांना ‘शेतकरी’ दर्जा
जिल्ह्यात ८५ हजार ९३९ महिलांची नोंदणी, धाराशिव तालुका अव्वल
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ४ ः ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या नावावर शेतजमीन नाही किंवा सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवलेले नाही, अशा महिला शेतकरी व शेतमजुरांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आता महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येत असून, यामुळे ग्रामीण महिलांना हक्काची ओळख मिळणार आहे.
या प्रमाणपत्रांमुळे ग्रामीण भागातील महिलांना आता कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, पीक विमा, सवलती आणि कृषी कर्जाचा लाभ मिळणे अधिक सुलभ होणार आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८५ हजार ९३९ पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. विशेषतः धाराशिव तालुक्यातील १७ हजार ३२३ महिलांनी जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी केली आहे. येत्या १७ तारखेपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलेच्या नावावर शेती असो अथवा नसो, १८ वर्षांवरील सर्व महिला या प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत. शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या महिला शेतमजूर, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला, कुक्कुटपालन किंवा पशुपालन करणाऱ्या महिलांनाही हे प्रमाणपत्र मिळणार आहे.
ऑनलाइन नोंदणीची सोय
महिलांना नोंदणीसाठी कोणत्याही क्लिष्ट कागदपत्रांची गरज नाही. महिलांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन अथवा स्वतःच्या मोबाइलवर देखील ही नोंदणी करता येते. शेती, शेतमजूर, पशुपालक, दुग्ध व्यवसाय हा पर्याय निवडावा लागतो. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर १५ ते ३० दिवसांच्या आत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. नोंदणीनंतर आपला अर्ज कोणत्या स्टेजवर आहे, याची माहितीही महिलांना घरबसल्या मिळणार आहे.
........
((चौकट))
नोंदणीत धाराशिव तालुका अव्वल
जिल्ह्यात धाराशिव तालुक्याने १७ हजार ३२३ महिला नोंदणीसह अव्वल स्थान मिळवले आहे. याशिवाय तुळजापूर (१५,२२३), उमरगा (१४,३६०), कळंब (९,८६१), परंडा (९,३४१), भूम (७,७०२), लोहारा (६,२३२) आणि वाशी (५,८९९) असा प्रतिसाद मिळाला आहे.
.......
((कोट))
शेती व्यवसायात महिलांचा मोठा आणि महत्त्वपूर्ण सहभाग आहे. शेतीतील महिलांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मिळावी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे प्रमाणपत्र उपयुक्त असून, महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
- योगेश लांबे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, धाराशिव
.............................
((पॉईंटर))
महिलांना घरबसल्या मोबाइलवरून असा करता येईल अर्ज
- लिंक https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/apply/
१ - लिंकवर जा व अर्ज करावर क्लिक करा
२ - नाव-आधार क्रमांक आणि ओटीपी टाका
३ - जिल्हा, तालुका, गावाचे नाव सिलेक्ट करा
४ - फार्मर आयडी असेल, तर होय नसेल तर नाही म्हणा
५ - मोबाइल नंबर टाका
६ - अर्ज सादर करा
७ - पोच पावती क्रमांक जतन करा