महिला लोकप्रतिनिधी क्षमता विकास कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर ः पद मिळाले आहे तर ओळख निर्माण करा, अधिकार मिळाला आहे तर आवाज उठवा आणि जबाबदारी मिळाली आहे, तर बदल घडवा, असा सूर महिला लोकप्रतिनिधी क्षमता विकास कार्यशाळेत उमटला. राष्ट्रीय महिला आयोग आणि ''यशदा'' पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने २९ ऑगस्टला सिडको येथील एमजीएम रुग्णालयाच्या सभागृहात ही एकदिवसीय कार्यशाळा झाली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., नंदिनी आवाडे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी आणि शरदचंद्र माळी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी न्यायाधीश अंबादासराव जोशी, विधितज्ज्ञ चैतन्य धारूरकर, डॉ. अनघा पेंडगावकर यांच्यासह भास्कर पेरे व मान्यवरांनी महिलांना कायदे, सुरक्षा, नेतृत्व आणि निर्णयक्षमतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत महिलांनी केवळ पद न भूषवता सकारात्मक बदलाचे ‘चेंज मेकर’ बनावे, असा संदेश देण्यात आला. या यशस्वी आयोजनासाठी स्नेहा देव, सतीश वानखेडे, सर्वेश पांडे व डॉ. आनंद कदम यांनी पुढाकार घेतला.