ABD26J83141
देऊळगाव जहागीर ः पाणीटंचाईविरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर रिकामे हंडे ठेवून ठिय्या आंदोलन करताना संतप्त महिला.
रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा
-
देऊळगाव जहागीरमध्ये पाणीटंचाईविरुद्ध महिलांचा एल्गार
सेनगाव, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या महिला आणि ग्रामस्थांनी शनिवारी (ता. १४) सकाळी रिकाम्या घागरी व हंडे घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ग्रामपंचायतीच्या दारात महिलांनी हंडे मांडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
देऊळगाव जहागीरमध्ये ऐन हिवाळ्यातच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावातील पाणीसमस्या कायमस्वरूपी सोडवावी, यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर वारंवार निवेदने दिली; मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेले नळ योजनेचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून ते अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सततच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर महिलांनी सकाळी १० च्या सुमारास मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत ग्रामविकास अधिकारी मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आणि योजनेच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी हे आंदोलन मागे घेतले.