छेडछाड किंवा पाठलाग
झाल्यास घाबरू नका!
---
बीड, ता. ७ : महिला व मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत बीड जिल्हा पोलिस दल आणि पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. वारंवार पाठलाग करणे, लक्ष ठेवणे किंवा त्रास देणे हा गंभीर गुन्हा असून, असा प्रकार घडल्यास महिलांनी न घाबरता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्टॉकिंग (पाठलाग करणे) किंवा छेडछाडीसारख्या प्रसंगांना सामोरे जाताना महिलांनी काय करावे, याबाबत पोलिसांनी महत्त्वाच्या ९ टिप्स आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. घाबरून न जाता शक्य तितक्या लवकर गर्दीच्या ठिकाणी किंवा विश्वासू व्यक्तींकडे किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. संशयित व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ, चॅट्स, कॉल लॉग आणि मेसेज जतन करून ठेवावेत. घटना घडताच १०० किंवा ११२ वर कॉल करावा अथवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. त्रास देणाऱ्या व्यक्तीला सोशल मीडियावरून ब्लॉक करा व अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नका. कुटुंब, मित्र किंवा सहकाऱ्यांना घटनेची कल्पना देऊन एकटे प्रवास करणे टाळावे. सतत एकाच मार्गाने जाणे टाळावे व प्रवासाच्या वेळेत-मार्गात बदल करावा. स्वसंरक्षणाचे प्राथमिक कौशल्य शिकावे आणि सेफ्टी ॲप्सचा वापर करावा. अशा व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा संवाद, मैत्री किंवा गप्पा मारणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.