एसटीच्या महिला सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती तूर्त शिथिल

एसटीच्या महिला सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती तूर्त शिथिल
Published on: 
महिनाअखेरपर्यंत कार्डाविना करता येणार प्रवास ---------- एसटीच्या महिला सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती तूर्त शिथिल ----- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १४ ः डिजिटल प्रक्रियेतील अडचणी, ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड नोंदणीबाबत ग्रामीण भागातील महिलांतील अनभिज्ञता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्डची सक्ती तूर्त शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता ३० नोव्हेंबरपर्यंत महिलांना स्मार्ट कार्ड नसतानाही एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारक प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले होते. एक ऑक्टोबरपासून कार्डाशिवाय सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया माहीत नसल्याने, कार्ड मिळविताना तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदणी, कार्डवाटपाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला नव्हता. त्यामुळे अनेक महिलांना सवलतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने सात ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्मार्ट कार्डची सक्ती शिथिल केली आहे. या मुदतीत महिलांना पूर्वीप्रमाणेच ५० टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य राहणार असल्याने पात्र प्रवाशांनी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे. दरम्यान, कार्ड नोंदणी प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांचे बायोमॅट्रिक जुळत नसणे, बोटांचे ठसे न उमटणे आणि कार्ड सक्रिय होण्यास विलंब अशा अडचणी येत होत्या. आता आधारशी संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातूनही नोंदणी करता येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ------ ((चौकट)) मुदतीपूर्वी कार्डनोंदणीचे आवाहन परभणी विभागातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील सातही आगारांतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. उर्वरित पात्र महिलांनी मुदतीपूर्वी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.