हाताला काम मिळण्यासाठी एल्गार
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मजुरांचा मोर्चा
- मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा
...........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. २ ः रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तत्काळ काम मिळावे, दुष्काळग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (ता.दोन) धाराशिव येथे स्वाभिमानी मजदूर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काम मागणी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो महिला मजूर, पुरुष मजूर आणि ग्रामीण भागातील कष्टकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख समन्वयक जीवन राठोड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू झाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. रोजगार हमीची कामे, दुष्काळी मदत, मजुरी वाढ, बेरोजगार भत्ता, जॉब कार्ड, ई-केवायसी, फेस अटेंडन्समधील तांत्रिक अडचणी तसेच फायनान्स कंपन्या व बँकांकडून होणारी सक्तीची वसुली थांबवण्याबाबत यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. समन्वयक लक्ष्मी ठाकूर, विजय राजपूत, वर्षा वाघमारे आणि आम्रपाली कांबळे यांनी गावोगावी जनजागृती करून मजुरांना संघटित केले.
मोर्चादरम्यान मार्गदर्शन करताना जीवन राठोड म्हणाले, की रोजगार हा मजुरांचा कायदेशीर हक्क असून ती शासनाची दया किंवा उपकार नाहीत. ग्रामीण भागात मजूरवर्ग रोजगाराअभावी व दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. वारंवार मागणी करूनही काम मिळत नाही आणि काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ताही दिला जात नाही. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन मजुरांना न्याय द्यावा. मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनावर मोठा राज्यस्तरीय मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
........
मजुरांच्या प्रमुख मागण्या...
- दुष्काळग्रस्त प्रत्येक मजूर कुटुंबाला तातडीने २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी.
- रोजगार हमीची कामे मागणाऱ्या सर्व मजुरांना तत्काळ काम उपलब्ध करावे.
- काम न मिळालेल्या मजुरांना नियमानुसार बेरोजगार भत्ता द्यावा.
- मजुरी प्रतिदिन ५०० रुपये करावी आणि प्रत्येक आठवड्यात मजुरी खात्यात जमा करावी.
- गरजू मजुरांना जॉब कार्ड देऊन ई-केवायसी मोफत पूर्ण करावी.
- फायनान्स कंपन्या व बँकांची सक्तीची वसुली बंद करावी.
...............
धाराशिव ः हाताला काम मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या मजूर महिला.
फोटो ःOSM26B07314