एक विद्यार्थी-एक औषधी वनस्पती उपक्रमाने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १९ : आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य आयुर्वेद महाविद्यालय ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये ११ वा जागतिक आयुर्वेद दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा अधिक आरोग्यदायी उद्यासाठी आयुर्वेद; एक आरोग्य, एक भविष्य या जागतिक संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम पार पडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेवगावचे प्रसिद्ध वैद्य प्रदीप पवार यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक कुलकर्णी यांनी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद आणि आहार या विषयावर मार्गदर्शन केले. महोत्सवामध्ये एक विद्यार्थी - एक औषधी वनस्पती हा अभिनव उपक्रम मुख्य आकर्षण ठरला. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते वनस्पती वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. कठीण व दुष्काळी परिस्थितीतही रोपांचे संवर्धन करण्याचा विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला. याशिवाय, विद्यार्थ्यांनी स्थानिक आणि दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन भरवून त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांविषयी समाजात जनजागृती केली.
युवा वर्गात आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी युवा आरोग्यात आयुर्वेदाची भूमिका या विषयावर निबंध स्पर्धा, इंटर्न विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पती शोध सत्र, फोटोग्राफी आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाच्या मूल्यानुसार जीवन जगण्याची, निसर्ग रक्षणाची आणि निष्ठेने रुग्णसेवेची शपथ घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
------
कोट:
निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी प्राचीन भारतीय आयुर्वेदातील जीवनपद्धती, आहार-विहार आणि नैसर्गिक उपचारांचा दैनंदिन जीवनात अवलंब करणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. आयुर्वेद हा आरोग्याचा उत्तम वारसा असून, त्याची कास धरूनच आपण सक्षम आणि निरोगी समाज घडवू शकतो.
- डॉ. आदिती सारडा, संचालिका, आदित्य शिक्षण संस्था