UMR26A19167
उमरगा : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व अस्मिता विश्वस्त मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ सेवाव्रती डॉ. दामोदर पतंगे यांच्या सत्काराप्रसंगी प्रा. डॉ. व्ही. वाय. जाधव, प्रा. शैलेश महामुनी, डॉ. भास्करराव पाटील, डॉ. सागर पतंगे.
- -
‘मनातील संवाद हरवत चाललाय ः प्रा. महामुनी
उमरगा, ता. १२ (बातमीदार) : तंत्रज्ञानामुळे सातासमुद्रापार असलेल्या व्यक्तींशी व्हिडिओ कॉलद्वारे सहज संवाद साधता येतो. मात्र, घरातील आणि परिसरातील ज्येष्ठांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी वेळ दिला जात नाही. दूरसंचार सुलभ झाला असला, तरी माणसांमधील मनोमीलन आणि भावनिक संवाद कमी होत चालला आहे, अशी खंत कवी प्रा. शैलेश महामुनी यांनी व्यक्त केली.
उमरगा येथील अस्मिता विश्वस्त मंडळ संचलित इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्रात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आर्य समाजाचे मंत्री प्रा. डॉ. व्ही. वाय. जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सेवाव्रती डॉ. दामोदर पतंगे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे डॉ. भास्करराव पाटील, डॉ. सागर पतंगे, प्रभाकरराव हिरवे आणि प्रा. व्यंकटेश रणखांब उपस्थित होते.
कार्यक्रमात (कै.) अनुसया सोपानराव रणखांब स्मृती श्रावणबाळ पुरस्कार स्वप्नील पतंगे व संगीता पतंगे यांना, तर आदर्श ज्येष्ठ नागरिक दांपत्य पुरस्कार राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक बसप्पा शिवलिंगप्पा माळगे यांना प्रदान करण्यात आला. प्रास्ताविकात सचिव प्रा. अभयकुमार हिरास यांनी वृद्ध सेवा केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. जाधव यांनी ज्येष्ठांना सकारात्मक व सर्जनशील जीवन जगण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. दामोदर पतंगे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रा. हिरास यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. मारुती खमीतकर यांनी आभार मानले.
.................
NUG26A02332
नळदुर्ग : येथील जैन मंदिरात पाणी बचतीचा संदेश देणारी रांगोळी रेखाटण्यात आली.
रांगोळीतून जलसंवर्धनाचा संदेश
नळदुर्ग, ता. १३ (बातमीदार) : येथील जैन मंदिरात पाणी बचतीचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दीपोत्सवानिमित्त साकारलेल्या आकर्षक रांगोळीतून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भक्ती आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.
येथील स्थानिक जैन मंदिरात समस्त जैन समाजाच्या वतीने भक्तिमय वातावरणात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाणी बचतीचा संदेश देणारी विशेष रांगोळी साकारण्यात आली. भक्ती पाटील, संजना पाटील, अश्विनी शेटगार, सिद्धांत पाटील आणि पारस पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. दीपोत्सवाच्या निमित्ताने जैन समाजातील बांधव एकत्र आले. यावेळी दुष्काळाचे आव्हान, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारणाची गरज यावर विचारमंथन करण्यात आले. केवळ शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीसाठी स्वतःहून पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अभिषेक आवटे यांनी उपस्थितांना जलसंवर्धन व पाणी बचतीची सामूहिक शपथ दिली. सूत्रसंचालन सूरज आवटे यांनी केले. जैन युवा मंचचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप झाला. रांगोळीचे नियोजन अक्षत आवटे व केवळ पाटील यांनी केले, तर दीपोत्सवाचे नियोजन शीतल पाटील, आदित्य पाटील व सक्षम पाटील यांनी केले. उपक्रमासाठी जैन युवा मंच आणि जैन महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
..........
UMR26A19185
स्वरा चव्हाण
नऊ वर्षांच्या स्वराची आंतरराष्ट्रीय भरारी
थायलंडमध्ये रौप्यपदक; आता इंडोनेशियातील स्पर्धेसाठी सज्ज
उमरगा, ता. १३ (बातमीदार) : वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आंतरराष्ट्रीय नृत्यविश्वात ठसा उमटविण्यासाठी उमरग्याची बालनृत्यांगना स्वरा शीतल चव्हाण सज्ज झाली आहे. इंडोनेशियातील बाली येथे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या ‘इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्हफेस्ट (आयआयजीएफ) २०२६’ या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
स्वराने यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये थायलंडमधील पटाया येथे झालेल्या १५ व्या कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स स्पर्धेत समूह नृत्यप्रकारात रौप्यपदक पटकावले होते. विशेष म्हणजे, याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिचे वडील ॲड. शीतल चव्हाण यांनी शिवतांडव नृत्य सादर करून कांस्यपदक मिळविले होते. आता दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी स्वराला मिळाली आहे. पुण्यातील फ्लॉलेस डान्स अकॅडमीच्या नृत्यशिक्षिका भक्ती जाधव-वरखेडे यांचे तिला मार्गदर्शन मिळाले आहे.
सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वरा नृत्यक्षेत्रात प्रगती करत आहे. सामाजिक व वैचारिक चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या स्वराने आपल्या कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाली येथील स्पर्धेत ती भारतासह उमरग्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झाली असून, या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
......................
उमरग्यात वीरमाता, वीरपत्नींचा गुरुवारी सन्मान
माजी सैनिक संघटनेचा गौरव सोहळा; खासदार डॉ. वाघमारे यांची उपस्थिती
उमरगा, ता. १३ (बातमीदार) : देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उमरगा येथे वीरमाता, वीरपत्नी आणि दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतीय माजी सैनिक संघटना आणि माजी सैनिक सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १९) सकाळी अकरा वाजता शांताई मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मानाने जीवन जगावे, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदा या सोहळ्याचे १६ वे वर्ष आहे. देशाच्या संरक्षणासाठी सैनिक देशप्रेम, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर कर्तव्य बजावतात. त्यांच्या कुटुंबीयांनीही अनेक त्याग केलेले असतात. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सन्मान करण्याचा हा उपक्रम आहे. राज्यसभेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा होणार आहे. यावेळी उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद सदस्या अर्चना युवराज जाधव, नगरसेविका ताराबाई महादेवप्पा दलगडे, उमरगा पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रल्हाद सूर्यवंशी, रामजीवन बोंदर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी निवृत्तीराव चालुक्य यांनी आयोजन केले आहे. समाजसेवेतील सैनिक आणि पदाधिकाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
................................
UMR26A19182
उमरगा : बलसूर येथील १५० कुटुंबांना आनंदाचा शिधा आणि पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचा खर्च टाळून
पोषण आहाराचे किट वाटप
उमरगा, ता. १३ (बातमीदार) : वाढदिवसाचा खर्च टाळून युवा उद्योजक रामकृष्ण सुरेश बिराजदार यांनी स्तुत्य उपक्रम राबविला. दीपावलीचे औचित्य साधून बलसूर येथील मागासवर्गीय वस्तीतील १५० कुटुंबांना आनंदाचा शिधा आणि पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सणाचा आनंद प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून रामकृष्ण बिराजदार यांनी वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बलसूर येथील १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात आले. यावेळी युवा नेते रामकृष्ण बिराजदार, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार उपस्थित होते. तसेच रमेश बिराजदार, महादेव नांगरे, चंद्रकांत भोसले, ब्रिजेशकुमार बिराजदार, चारुदत्त कांबळे, प्रदीप पाटील, मुन्ना हंद्राळे, गुरुलिंग वाकडे, पवन पाटील, सत्यनारायण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.