युवकांसाठी कलागुणांना वाव देण्याची सुवर्णसंधी
बीडमध्ये २६ व २७ नोव्हेंबर रोजी रंगणार युवा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १३ ः युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने, बीडमध्ये आगामी २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील राजीव गांधी चौकातील ‘तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात’ हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तुलसी शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवांतर्गत समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन या विविध कला आणि सांस्कृतिक स्पर्धा पार पडतील. याशिवाय, निवड झालेल्या सर्वोत्तम ५० निबंधांमधून जिल्हास्तरीय प्रत्यक्ष सादरीकरण (प्रेझेंटेशन) घेतले जाणार आहे. यासाठी ‘नवनिर्मिती आधारित अर्थव्यवस्था’, पर्यटन आणि सर्जनशील उद्योग हे विषय देण्यात आले आहेत.
प्रत्येक कला प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांचे वय १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये, आयटीआय आणि इतर महाविद्यालयांतील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा.
मुदतीनंतर किंवा ऐनवेळी येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, किंवा जितेंद्र आराक यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.