
रक्तदान चळवळीसाठी तरुण भारत भ्रमंतीवर
औरंगाबाद - कोरोनाच्या काळात रक्ताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. रक्तामुळे शेकडो, हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रक्तदानाची चळवळ झाली पाहिजे, यासाठी दिल्लीचा किरण वर्मा हा तरुण देशाच्या पदयात्रा भ्रमंतीवर निघाला आहे. तब्बल साडेसहा हजार किलोमीटरची पदयात्रा करीत किरण शनिवारी (ता. तेरा) औरंगाबादेत पोचला. ५ मिलियन डोनर तयार झाले तर रक्तामुळे एकही मृत्यू होणार नाही, यासाठीच ही धडपड किरणने सुरू केली आहे.
देशात रक्ताअभावी दररोज बारा हजार लोकांचा मृत्यू होतो. ही विदारक परिस्थिती आहे, कोरोना काळात हे महत्त्व अधिक जाणवले आहे. शिवाय देशात भुकेलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच ‘सिंपली ब्लड’ आणि ‘चेंज विथ वन मिल’ ही मोहीम सुरू केल्याचे किरण वर्मा यांनी सांगितले.
रक्तदानाची चळवळ व्हावी यासाठी समाजसेवक किरण वर्मा हे मूळ दिल्लीचे रहिवासी आहेत. कुठल्याही चळवळीची सुरुवात ही जनजागृती असलेल्या ठिकाणाहून व्हावी म्हणून त्यांनी रक्तदान चळवळीच्या पदयात्रेला त्रिवेंद्रम (केरळ) येथून सुरुवात केली. ३१ डिसेंबर २०२१ रोजी हा तरुण पदयात्रेने निघाला आहे. २१ हजार किलोमीटरचे उद्दिष्ट असले तरीही हा प्रवास कितीतरी अधिक होणार असून आणखी दोन वर्षे पदयात्रा करून दिल्लीत पोचणार असल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले.
साडेसहा हजार किलोमीटर
देशाच्या प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशातून आपण रक्तदान चळवळीसाठी निघालो असल्याचे किरण वर्मा यांनी सांगितले. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात, दादरा नगर हवेली आता महाराष्ट्रातून त्यांची ही भ्रमंती सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी सत्तर ते ऐंशी जिल्हे पिंजून काढले आहेत. आतापर्यंत पाच लाख लोकांपर्यंत पोचल्याचा दावा त्यांनी केला.
प्रबोधनावर भर
पदयात्रा सुरू असताना विविध शहरात शाळा, महाविद्यालय आणि जाताना जिथे- जिथे घोळका दिसेल तिथे थांबून रक्दानाचे महत्त्व पटवून सांगत आहेत. प्रत्यक्ष कृतीला सोशल मीडियाची जोड आहे. एक लाखापेक्षा अधिक फॉलोवर्स झालेले असल्याने आता दररोज अनेक जण रक्तदान शिबिरे घेत फोटो शेअर करत आहेत.