ओपनस्पेस विकणारे आता औसा पालिकेच्या टार्गेटवर

जलील पठाण
Wednesday, 13 January 2021

मुळ नकाशावरील सर्व ओपनस्पेस पालिका घेणार ताब्यात....सर्वसाधारण सभेत अफसर शेख यांची महत्वपूर्ण घोषणा

औसा (लातूर): औसा शहरासह हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील मुळ नकाशावर असलेले ओपनस्पेस पालिका ताब्यात घेणार आहे. अनेकांनी मुळ नकाशावरील ओपनस्पेस नंतर बनावट नकाशे तयार करुन ते विक्री केलेले आहेत. त्यामुळे औशात बहुतांश प्लॉटिंगमध्ये मुळ नकाशात दाखविलेले ओपनस्पेस व रस्तेच गायब आहेत.

भू-माफीयांनी विकलेल्या या ओपनस्पेसवर आता मोठ- मोठ्या इमारती ऊभ्या असताना नगराध्यक्ष अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना ही जागा मोकळी करण्यासाठी मोठ्या यंत्रणेसह अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र पालिकेच्या सभागृहात झालेल्या या ठरावाला औसा शहरातील सर्वसामान्य लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचासर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत काँग्रेसचा नांदेडमध्ये जल्लोष

जर ठरल्याप्रमाणे पालिकेने मुळ नकाशावर असलेले रस्ते आणि ओपनस्पेस मोकळे केले तर एका सुंदर शहराची संकल्पना सत्यात उतरणार आहे.
औसा शहरात व अजुबाजुच्या परिसरात आनेक प्लॉटिंगवाल्यांनी नगररचनाकाराकडे रितसर अर्ज करीत एनए लेआऊट घेतले आहेत. मात्र प्रस्ताव मंजूर झाल्यावर मुळ नकाशाच बदलत बनावट नकाशे तयार करुन चक्क सोडलेले ओपनस्पेस व रस्ते प्लॉट पाडून विकले.

औसा पालिकेची ऐतिहासिक हद्दवाढ झाल्यानंतर यामध्ये पालिकेच्या हद्दीत सारोळा रोड, याकतपुर रोड, नागरसोगा रोड, आलमला रोड यासह सुमारे 53.02 हेक्टर भाग हद्दीत आला. शहराबाहेर मोठ्या प्रमाणात प्लॉटविक्री झाली असून यातील बहुतांश प्लॉट मालकांनी आख्खे ओपनस्पेस व सोडलेले रस्ते प्लॉट पाडून विकले आहेत. बुधवारी (ता. 13) ला औसा पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी हा विषय समोर आल्यावर नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे जिल्हाधिकारी यांच्याकडे येथील ओपनस्पेस बाबतीत प्रस्ताव पाठविणार आहेत.

जर जिल्हाधिकारी यांनी मूळ नाकाशातील ओपनस्पेस शोधून त्यावरील अतिक्रमण बेकायदेशीर ठरवले तर अनेकांना लाखो रुपयांचा चुना लागणार असून बांधलेले घरही सोडावे लागणार आहे.

हुश्श...सुटले बुवा एकदाचे...मुरुंब्यातील त्या 28 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

ओपनस्पेस विक्रेत्यांवर काय कारवाई होणार?

शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून नगर रचनाकार यांच्या लेआऊटला छेडछाड करीत बनावट लेआऊट करून ओपनस्पेस व रस्ते विकणाऱ्या प्लॉट मालकांवर यात काय कारवाई होते हाच मूळ मुद्दा आहे. ओपनस्पेस विक्री करून प्लॉट मालकाने तर पैसे कमावले मात्र यात आता सर्वसामान्य जनता भरडली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी हे ओपनस्पेस विकले त्यांच्याकडून सर्व भरपाई प्रशासनाने करून द्यावी असा सूर आता ओपनस्पेसमध्ये प्लॉट घेतलेल्या लोकांकडून उमटत आहे.

जर नगराध्यक्ष अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी पालिकेच्या हद्दीतील सर्व ओपनस्पेस मोकळे केले तर खऱ्या अर्थाने औशाच्या विकासाला आणि शहराच्या सौन्दर्याला वेगळे रूप येणार आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ausa news encroachment Openspace sellers are now the target of Ausa Palika