औशाच्या तहसीलदार ग्राहक बनून किराणा दुकानात, चढ्या दराने विक्री

जलील पठाण
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. काही किराणा दुकानात किराणा माल चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी औशाच्या तहसीलदार डॉ. शोभा पुजारी यांना प्राप्त झाल्याने यातील सत्यता तपासण्यासाठी त्या गुरुवारी (ता.२६) येथील हनुमान मंदिर परिसरात असणाऱ्या किराणा दुकानात चक्क तोंडाला बांधून त्यांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे किराणा मालाची खरेदी केली.

औसा (जि.लातूर)  : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. काही किराणा दुकानात किराणा माल चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी औशाच्या तहसीलदार डॉ. शोभा पुजारी यांना प्राप्त झाल्याने यातील सत्यता तपासण्यासाठी त्या गुरुवारी (ता.२६) येथील हनुमान मंदिर परिसरात असणाऱ्या किराणा दुकानात चक्क तोंडाला बांधून त्यांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे किराणा मालाची खरेदी केली.

संचारबंदीच्या काळात काही किराणा दुकानदार चढ्या दराने किराणा माल विकून ग्राहकांची लूट करीत असल्याचा तक्रारी येथील तहसीलदार शोभा पुजारी यांच्याकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी आपले तोंड ओढणीने पूर्ण झाकून बसस्थानकाजवळील एका किराणा दुकानात ग्राहक म्हणून गेल्या. पुढचे ग्राहक होईपर्यंत त्या दुकानासमोर थांबल्या. त्यांचा नंबर आल्यावर त्यांनी या दुकानातून किराणा खरेदी करण्यास सुरवात केली. बोलता बोलता किराणा वस्तूच्या दराची चौकशी करून घेतली. त्यांच्यासोबत असणाऱ्या नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख व पालिकेचे मुख्याधिकारी यांना त्यांनी लांब उभे केले होते. तहसीलदारांच्या या ग्राहक बनून गुप्त मार्गाने केलेल्या चौकशीने चढ्या भावाने किराणा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, जर कोणी जास्त दराने किराणा अथवा जीवनावश्यक वस्तूंची विक्री केल्याचे दिसून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार श्रीमती पुजारी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

वाचा ः  कोरोनाचा परिणाम ः पुण्या, मुंबईच्या पाहुण्यांनी गाठला पन्नास हजारांचा आकडा

रुग्णालयात खाटा वाढविण्यासाठी निधीला मंजुरी द्या
औसा विधानसभा मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालये व ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवता यावी याकरिता आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात आमदार श्री. पवार यांनी म्हटले आहे, की औसा मतदारसंघातील अनेक तरुण व नागरिक व्यवसाय व उद्योगांच्या निमित्ताने मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह इतर राज्यांतही आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे उद्योग, व्यवसाय बंद झाले असून भीतीपोटी हे नागरिक गावाकडे येत आहेत. गावात येणाऱ्या या नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केंद्र अर्थात कोरोना कक्ष निर्मिती करण्यात आलेली आहे. औसा मतदारसंघातील तीन ग्रामीण रुग्णालये व नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांत खाटांची संख्या मर्यादित आहे. त्यातही प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व इतर रुग्णांसाठी याच खाटा वापराव्या लागतात. त्यामुळे कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी अधिक खाटांची गरज आहे.

प्रत्येक आरोग्य केंद्रात अधिकच्या खाटा उपलब्ध होण्यासाठी बेड खरेदी कराव्या लागणार आहेत. यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करावा. ही बाब अत्यावश्यक असल्याने तातडीने मंजुरी देऊन खाटा वाढवून देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असेही आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आणीबाणीच्या या परिस्थितीत खाटा कमी पडत असल्याने आरोग्य विभागही हतबल असल्याने आमदारांनी दाखविलेल्या या समयसूचकतेमुळे कोरोनाविरोधात चाललेल्या या लढाईला काहीअंशी का होईना बळ मिळाले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ausa Tahsildar Go Grocery Shop As Customer, Ausa