esakal | टाळेबंदीचा लेखकांनी केला सदुपयोग, आकाराला येतीय मौलिक ग्रंथसंपदा
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Literature

टाळेबंदीमुळे घरात राहून काय करायचे, याचा ताण अनेकांनी घेतला आहे. पण, एखादा छंद असेल तर ताण घालवता येऊ शकतो आणि वेळेचा सदुपयोग करता येऊ शकतो, हे लातूरातील नामवंत लेखकांनी कृतीतून दाखवून दिले आहे. महिनाभराच्या काळात वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घरात राहून पुस्तके लिहिली आहेत. संचारबंदी संपताच ती प्रकाशित करून वाचकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

टाळेबंदीचा लेखकांनी केला सदुपयोग, आकाराला येतीय मौलिक ग्रंथसंपदा

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : टाळेबंदीमुळे घरात राहून काय करायचे, याचा ताण अनेकांनी घेतला आहे. पण, एखादा छंद असेल तर ताण घालवता येऊ शकतो आणि वेळेचा सदुपयोग करता येऊ शकतो, हे लातूरातील नामवंत लेखकांनी कृतीतून दाखवून दिले आहे. महिनाभराच्या काळात वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घरात राहून पुस्तके लिहिली आहेत. संचारबंदी संपताच ती प्रकाशित करून वाचकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांतून त्यांनी छंद जोपासण्याचा सल्लाही वाचकांना दिला आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून सरकारने टाळेबंदी जाहीर केली.

शाळा -महाविद्यालयांपासून अनेक उद्योगधंदे कुलूपबंद स्थितीत आहेत. जाहीर समारंभ-सोहळे यांच्यावरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिकांप्रमाणेच लेखकांनाही घरात बसून राहावे लागत आहे. व्याख्याने-चर्चासत्र यानिमित्ताने लेखकांचे होणारे दौरेही बंद झाले आहेत. पण, घरात बसून करायचे काय, असा प्रश्न लेखकांना पडला नाही. ते वेगवेगळ्या विषयांवरील लेखनात रमले असल्याचे दिसून येत आहे.


ज्येष्ठ अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे म्हणाले, ‘कोरोना’मुळे माझ्या जीवनशैलीत एकमेव फरक पडला. तो म्हणजे घराबाहेर जाणे बंद झाले आणि बाहेरून घरात भेटायला येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे वेळ भरपूर मिळू लागला. बाबुराव बागुल आणि उत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या कथांचा हिंदीत अनुवाद केला आहे. या कथा लोकवाङ्‌मय गृहातर्फे पुस्तकरुपाने प्रकाशित होतील. ‘विमर्श: स्वरूप और अवधारणा’ हे समीक्षेवरील पुस्तक लिहून पूर्ण झाले आहे. याशिवाय, अनुवादावरील माझ्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. यासंदर्भातील लेखनही पूर्ण झाले आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने लेखन सुरू आहे. लेखनापेक्षाही सध्या वाचनाला जास्त वेळ देत आहे.


साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले, कुलगुरू असताना किंवा राज्यसभेवर खासदार असताना लेखनाला फारसा वेळ मिळत नव्हता. तरीसुद्धा वर्षातून किमान दोन पुस्तके प्रकाशित व्हायची. निवृत्तीनंतरही उद्घाटन, संमेलन, चर्चासत्र अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलावले जाते. हे कार्यक्रम सध्या कोरोनामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे पुष्कळ वेळ मिळू लागला आहे. या वेळेत मी वचन साहित्यावर प्रदीर्घ लेख लिहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दत्ता भगत यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. महात्मा फुले हे उत्तम कवी-साहित्यिक होते. या अंगाने फारसे लेखन झाले नाही. यावरही प्रदीर्घ लेख लिहून पूर्ण झाला आहे. सध्या सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यावर लेखन सुरू आहे.

Video-लॉकडाउन : गरजू मुलींच्या आयुष्यात पेरला आशेचा किरण, कुणी? ते वाचाच

डॉ. बारलिंगे सम्रग साहित्य
भारतात आणि परदेशात तत्त्ववेत्ते म्हणून परिचित असलेले डॉ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे साहित्य-संस्कृती मंडळाने त्यांचे समग्र साहित्य दोन खंडात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार यांच्यावर सोपवली. डॉ. कुंभार यांनीच समग्र साहित्य प्रकाशित व्हावे, असा प्रस्ताव मंडळाकडे सादर केला होता. हा प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आहे, असे डॉ. कुंभार यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे बराच वेळ उपलब्ध झाला होता. या वेळेचा सदुपयोग केल्याचेही ते म्हणाले.